नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज भाजपकडून देशभरात ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी साडेपंधरा लाख कोटी रूपयांची माहिती आपल्याकडे नव्हती. हे पैसे कोणाकडे आहेत आणि त्याचा उपयोग कशाप्रकारे होत आहेत, याची कोणतीही नोंद नव्हती. मात्र, नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला. नोटाबंदी झाली नसती तर ही रक्कम कधीच सापडली नसती. यापैकी काही रक्कम संशयातित असून त्याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे यामध्ये काळा पैसा सापडल्यास त्याच्यावर करवसुली करणे शक्य होईल, असे फडवणीस यांनी म्हटले. तसेच नोटाबंदीमुळे बेहिशोबी पैसा मोठ्या प्रमाणावर समोर आला. हे पैसे बँक खात्यामध्ये आल्यामुळे त्याचा नेमका स्त्रोत कळाला. त्या आधारे आयकर विभागाने कारवाईला सुरूवात केली. या कारवाईदरम्यान आपल्याकडील बेकायदा संपत्ती स्वत:हून उघड करण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले. तर कारवाई करून पकडण्यात आलेल्या बेहिशोबी रक्कमेचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले. काळा पैसा हुडकून काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईत एकूण २९, २१३ कोटी रूपये हाती लागल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

तत्पूर्वी केंद्र सरकारनेही नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर लगाम लावण्यात यश आल्याचा दावा केला आहे. नोटाबंदीनंतर लोकसंख्येपैकी ०.०००११ % लोकांनी देशातील उपलब्ध एकूण रकमेच्या ३३ टक्के रक्कम जमा केल्याचे सरकारने म्हटले आहे. हा आकडा ५ लाख कोटींच्या घरात असल्याचा दावा सरकारने केला.

अमित शहा आणि त्यांच्या मुलाच्या संपत्तीत झालेली वाढ हेच नोटाबंदीचे खरे यश- लालू प्रसाद यादव

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारने सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या असून यात नोटाबंदीमुळे झालेले फायदे सांगण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून सात मिनिटांच्या व्हिडिओतही नोटाबंदीमुळे सरकारने नेमके काय साधले याची मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ्या पैशांचा शोध लागल्याचा दावा सरकारने केला आहे. १७. ७३ लाख संशयित प्रकरणे उघडकीस आली असून २३.२२ लाख खात्यांमध्ये अंदाजे ३. ६८ लाख कोटी रुपयांची संशयित रोकड जमा करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. दहशतवाद आणि नक्षलवादावरही लगाम लावण्यात यश आले असून काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांमध्ये ७५ टक्के घट झाली. तर ७.६२ लाखांचे बनावट चलन सापडले. याशिवाय बोगस कंपन्यांना काळा पैसाही समोर आला आहे. २. २४ लाख बोगस कंपन्या बंद केल्याचे सरकारने सांगितले.

खोटारडेपणा चालणार नाही; राहुल गांधींच्या शायरीला अमित शहांचे उत्तर