‘स्वच्छ भारत’ मध्ये स्वयंसेवी संस्थांना सहभागी करण्याचे प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वच्छ भारत अभियानाचे स्वप्न साकारण्यासाठी धडपडणाऱ्या स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील राज्यातील किमान पाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून स्वयंसेवी संस्थांना सहभागी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून परिणामी स्वच्छ भारत मिशनच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला आणि राज्यभरात हागणदारी मुक्तीची चळवळ उभी राहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वप्नातील भारत घडविण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका वठविणारे स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका मोलाची आहे. पायाला भिंगरी बांधल्यागत कंत्राटी कर्मचारी भल्या पहाटेपासून झटत आहेत. ज्यांनी कंत्राटी कर्मचारी स्वच्छता दूत ठरण्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागात उमटत आहेत. देशाला हागणदारीमुक्त करून स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन स्वच्छभारताचे स्वप्न देशवासीसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले. तत्पूर्वी केंद्र शासनाने गेल्या दहा वर्षांपासून निर्मल भारत प्रक्रिया राबवून या चळवळीला गतिमान केले. आता तर खुद्द नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रमुख अजेंडय़ावर स्वच्छ भारत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळ संपूर्ण देश हागणदारी मुक्तीसाठी नियोजन बध्द आखणी करून कामाला लागले आहे. प्रत्येक जिल्हा परिषद अहोरात्र मेहनत घेऊन राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी झटत आहे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष (स्वच्छ भारत मिशन) उभारला गेला आहे. या कक्षात कंत्राटी स्वरुपात कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून हेच कर्मचारी पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला साक्षात उतरविण्याकरिता जीवाचे रान करीत आहेत. गेल्या दहा वषार्ंपासून हा कक्ष याचा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर निर्मल ग्राम योजनेला व देशाला आकार देत आहे. आता तर राज्य हागणदारी मुक्त करण्यालाही लोकचळवळ उभारली जात असून या चळवळीचे पाईक अर्थातच हे कंत्राटी कर्मचारी आहेत. घरात शौचालये बांधा अशी आर्त हाक सुध्दा कंत्राटी कर्मचारी गावातील लोकांना देत आहेत. भल्या पहाटे पाच वाजता हे कर्मचारी कुठल्याही गावाच्या गोदरीत हजर असतात. हातात गुलाबाचे पुष्प घेऊन ते प्रात: विधीला येणाऱ्या व्यक्तीच्या प्रतीक्षेत असतात. तो आला की त्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात.
स्वच्छतेमुळे होणारे फायदे व शासनाची योजना पटवून देणे त्याला शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करते. हे कार्य गेल्या कित्येक वषार्ंपासून सुरू आहे. कित्येक गावे हागणदारी मुक्त होत असून उघडय़ावर विष्टा दिसणे बंद होत आहे. स्वच्छ गाव समृध्द गाव हे ब्रिद आता प्रत्यक्षात उतरत आहे. अर्थात याचे श्रेय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समर्पित भावनेतून घडत आहे. भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हे कर्मचारी समाज सुधारकाचे काम करीत आहेत. पायाला भिंगरी बांधल्यागत हे कार्य अहोरात्र सुरू आहे. मात्र कर्मचारी कपातीच्या नावाखाली अनेक योजना बंद करण्याचे षडयंत्र आहे. यामध्ये स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना हे दोन्ही उपक्रम बंद करून तेथील कंत्राटी कर्मचारी कमी करून स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेण्याचा प्रकार सुरू आहे. असे झाले तर हे संपूर्ण अभियान कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्यापासून तालुका स्तरावर शेकडो युवक आपल्या उमेदीचे वष्रे या योजनेत घालवून बसले आहेत. स्वच्छतेचे व्रत स्वीकारणारे हे तरुण आता चळिशीकडे वाटचाल करीत आहेत. त्यांना इतरत्र रोजगाराची दारे बंद झाली असतांनाच सरकारने त्यांना कमी करण्याची भीती वर्तविली जात आहे. तसेच झाले तर कंत्राटी कर्मचारी आयुष्यातून उठतील. शिवाय निर्मल होण्याच्या दिशेने वाटचाल करणारे महाराष्ट्र पुन्हा गोदरीकडे जाऊ लागेल. लोकांनी शौचालय बांधले असले तरी त्याचा वापर करून स्वच्छतेची कास धरण्यासाठी त्यांना समुपदेशनाची गरज आहे. ही गरज कंत्राटी कर्मचारी पूर्ण करीत असल्याने त्यांना कायम ठेवून ही चळवळ आणखी गतिमान करण्याची गरज कंत्राटी कर्मचारी संघटनेने येथे व्यक्त केली आहे.