राज्यात विविध भागांत गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना रविवारी नागपूर शहरालाही वादळी पावसासह गारपिटीचा फटका बसला. याशिवाय, विदर्भात वर्धा व यवतमाळ या दोन जिल्ह्य़ांना वादळी पावसाने झोडपून काढले. नागपुरात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. सुटीचा दिवस असल्यामुळे शहरातील विविध भागांत वर्दळ असताना अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
दरम्यान, नागपूर जिल्ह्य़ात ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाऊस व गारपीट झाली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आजचा वादळी पाऊस व गारपिटीने त्यात भरच पडणार आहे.
नाशिकमध्ये रेल व रास्ता रोको
दरम्यान, सलग पाच दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाहणी दौऱ्याच्या दिवशी उफाळून आला. रेल रोको, रास्ता रोको करत त्यांनी संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. या घडामोडींमुळे ज्या ठिकाणी वातावरण आंदोलनमय झाले, त्या निफाड तालुक्यात भेट देणे टाळत पालकमंत्र्यांनी सिन्नरचा रस्ता धरला. निफाड तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी तीन तास मनमाड-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक रोखून धरली. रास्ता रोकोचा फटका माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहन ताफ्यालाही बसला.

*शहरातील विविध भागांना गारपिटीचाही फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच विजेचे खांबही कोसळल्याने काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
*या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पंधरा ते वीस मिनिटे गारपीट झाल्याने शहरातील विविध भागांत रस्त्यावर गाराचा खच होता.
*स्मृतिभवन परिसरातील
अखिल भारतीय प्रतिनिधींसाठी उभारण्यात आलेल्या शामियान्याचे नुकसान झाले.