महापालिकेच्या ७८ शाळांपैकी बहुतांश शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा तर पत्ताच नाही. जेथे क्रीडांगणासाठी मोकळी जागा आहे, तेथे रात्री लोक नाना धंदे करतात. बऱ्याचदा मैदानावरून बीअरच्या बाटल्या शिक्षकांना फेकून द्याव्या लागतात. सुरक्षारक्षक नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी वेगळय़ाच. काही शाळांभोवती गुंडांचे टोळके उभे राहते. त्यामुळे मुली शाळेतच येऊ शकत नाहीत, यांसह अनेक तक्रारींचा पाढा शिक्षकांनी बुधवारी महापौर त्र्यंबक तुपे व उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यासमोर वाचला. भौतिक सुविधांबरोबरच शिक्षकांनी तक्रार केली वेतनाची. दर महिन्याला २२ किंवा २३ तारखेला वेतन मिळते. किमान तेवढे तरी वेळेवर द्या, अशी मागणी झाली आणि महापौरांनी या तक्रारीचा चेंडू उपमहापौरांकडे ढकलला. त्यांनीही हा विषय आर्थिक असल्याचे सांगत त्या महिन्याचा पगार त्याच महिन्यात मिळतो आहे. त्यामुळे समाधान माना असे सांगत शिक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
महापालिकाअंतर्गत शिक्षणाची स्थिती जाणून घेण्यासाठी महापौर तुपे यांनी शहरातील काही शाळांना बुधवारी भेटी दिल्या आणि शिक्षकांची विशेष बैठकही घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित बैठकीत शिक्षकांच्या तक्रारी ऐकून अवाक होण्यापलीकडे कोणाच्या हातात काहीच नसल्याचे चित्र दिसून आले. मिटमिटा भागात महापालिकेतील शाळेच्या मुलांना प्रार्थनेला उभे राहण्यासाठीही जागा नाही. आणलेला डबा मुले खातील कुठे, असा प्रश्न विचारत येथील शिक्षकांनी नवीन इमारतीची मागणी केली. ५५४ विद्यार्थ्यांसाठी ५ खोल्यांची शाळा कशी पुरेल, असा प्रश्न शिक्षकांनी केला.
नारेगाव येथील शाळेत १ हजार ७०० विद्यार्थिसंख्या असताना पिण्याच्या पाण्याची सोय काही उपलब्ध नाही. शाळेकडे जाणारी जलवाहिनीच कोणीतरी तोडली. नव्याने दोन खोल्या बांधण्याची मान्यता देण्यात आली. पण काम काही सुरू झाले नाही. ८ उर्दू शिक्षकांची गरज आहे. आदेश निघाले, पण रुजू कोणी झाले नाही. मिसारवाडी येथील शाळा भाडय़ाच्या इमारतीत भरते. शाळाबाहय़ मुलांसाठीही येथे नवीन शाळा उघडण्यात आली, तेव्हा तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे मोठे कौतुक झाले. मात्र, या शाळेला सुविधाच दिल्या गेल्या नाहीत, असे शिक्षकांनी सांगितले. आता या शाळेत पाचवीचा वर्ग उघडण्याची आवश्यकता आहे.
ब्रीजवाडी येथील शाळेची इमारत मोडकळीस आली. बाजूला दारूचे दुकान आहे. शाळेसाठी मैदान मोठे आहे. तेथे तरुणांच्या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू असतात. त्यांना थांबवता येत नाही. परिसर एवढा मोठा आहे, की त्यावर देखरेख करणे शक्य नाही. किमान रखवालदार द्यावा, अशी मागणी करण्यात आली. एका शिक्षिकेने किमान शाळेच्या इमारतीत विवाहसोहळे घेण्याचे तरी थांबवा, अशी विनंती महापौरांना केली.
बन्सीलाल नगरमधील शाळेचे छत गळते, अशी तक्रार करण्यात आली तेव्हा महापौर म्हणाले, आता तेथून आमदारांचे चिरंजीव निवडून आले आहेत. त्यांनाच शाळा दुरुस्त करून द्या, असे आपण सांगू. क्रीडांगणामध्ये पाणी भरते, नीटशी साफसफाई होत नाही. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे, असे शिक्षकांनी सांगितले. शहरातील अजबनगर भागात एकशिक्षकीच शाळा भरते, असेही सांगण्यात आले. नियमानुसार प्रत्येक शाळेत दोन शिक्षक असणे आवश्यक आहे. त्या शाळेतून शिक्षक बैठकीला किंवा रजेवर गेला तर ती शाळाच भरत नाही, अशी धक्कादायक माहितीही महापौरांना देण्यात आली.
इंदिरानगर बायजीपुरा भागातील शिक्षिकेने तर महापौरांसमोर मोठे वास्तव मांडले. त्या म्हणाल्या, या भागातील महापालिकेची शाळा दहावीपर्यंतची आहे. परिसरात मुलींची छेड काढणाऱ्यांची संख्या एवढी आहे, की त्यांना थांबवताच येत नाही. बंदूकधारी रखवालदार द्यावा, अशी मागणी त्यांनी लेखी स्वरूपात केली. एका ओटय़ावर बसलेल्या या गुंडांना थांबवण्यासाठी पोलिसांना वारंवार सांगण्यात आले. बऱ्याचदा साध्या वेशातील पोलीस येऊन जातात. मात्र, पुढे काही झाले नाही. आता या प्रश्नी तुम्हीच लक्ष घाला, अशी विनंती येथील शिक्षिकेने महापौरांकडे केली. हा प्रश्न सोडविण्यास तातडीने पोलीस आयुक्तांशी चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
धूळ खात पडलेले संगणक, काही ठिकाणी विजेची उपलब्धता नसणे या समस्याही शिक्षकांनी आवर्जून सांगितल्या. भौतिक सुविधांची कमतरता लक्षात आल्यानंतर वेगवेगळय़ा कंपन्यांच्या सीएसआर फंडातून काही रक्कम उभी करता येऊ शकते का, याची चाचपणी करू, असे उपमहापौर राठोड यांनी सांगितले. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्रुटी दूर करण्यासाठी शिक्षकांशी चर्चा व्हावी, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे कसे मातेरे झाले आहे, हे महापौरांना शिक्षकांनीच सांगितले.