News Flash

करोना संकटातही गलिच्छ राजकारण करणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी! – पटोले

मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले गंभीर आरोप; जाणून घ्या आणखी काय म्हणाले.

संग्रहीत

“देशात सध्या करोनाने थैमान घातलेले असताना कालपर्यंत गायब असलेले देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अतीसक्रिय होत, अत्यंत हीन पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केला आहे.” अशी टीका करून, “डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे.” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व भाजपावर निशाणा साधताना नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना जनाची तर नाही मनाची थोडीफार शिल्लक असेल, तर केंद्राचा कैवार घेऊन महाराष्ट्रावर खोटेनाटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा नतद्रष्टपणा आणि महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करून, महाराष्ट्रासाठी आवश्यक करोना लस, रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यास सांगावे.”

तसेच, “एका वर्षापूर्वी केंद्र सरकारने करोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केले. आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार आपत्ती जाहीर करणे याचा अर्थ त्या आपत्ती निवारणाची सर्वप्रकारची जबाबदारी आणि बांधिलकी स्वीकारणे आहे. त्यामुळे या आपत्तीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. पण दुर्देवाने केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे जबाबदारीपासून पळ काढत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अश्लाघ्य पद्धतीने बेजबाबदारपणे आरोप करत आहेत.” असंही नाना पटोले यांनी बोलून दाखवलं.

“करोनाच्या दुस-या लाटेचा अंदाज घेऊन केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नियोजन करणे ही राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा २००५ नुसार जबाबदारी होती परंतु तिचे पालन न करता देशातील नागरिकांच्या जीविताचा विचार न करता केंद्र सरकारने देशातील केवळ ८ कोटी नागरिकांना लस दिली असून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रासहित इतर देशांना मोठ्या प्रमाणात मोफत लस पाठवली आहे. लसीचा पुरवठा, लसींची उपलब्धता, रेमडेसीवर व ऑक्सीजनचा पुरवठा याबाबतीत वस्तुनिष्ठ निर्णय़ घेण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करून देशाची दिशाभूल करत आहे.” असा आरोप देखील पटोले यांनी यावेळी केला.

 करोनामुक्त महाराष्ट्रासाठी काँग्रेसची २४X७ हेल्पलाईन –
काँग्रेस राज्यात कोरोनामुक्त महाराष्ट्र अभियान राबवत असून लवकरच सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या कार्यालयात २४X७ हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. याचे मुख्य कार्यालय मुंबईतील पक्ष कार्यालयात असेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून करोना रुग्णांना सर्वप्रकारची मदत मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. तसेच, राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून १४ एप्रिलपासून राज्यभर रक्तदान शिबिरं देखील आयोजित करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 6:28 pm

Web Title: union health minister and bjp should apologize to maharashtra for doing dirty politics even in corona crisis patole msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “दादा मास्क काढा….,” भाषणादरम्यान चिठ्ठी पाठवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी सुनावलं
2 “…मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय?”
3 मोठी बातमी! अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का
Just Now!
X