नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे  यांच्या विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडे लेखी तक्रार केली आहे. नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भातल पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून तुकाराम मुंढे यांनी सीईओ पद बळकावल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात केंद्र सरकारला हे पत्र लिहिलं आहे. ज्यात ते म्हणतात, “नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन हे अवैध आणि घोटाळेबाज आहे. हे सीईओपदही त्यांनी बळकावलं आहे” या आशयाचा मजकूर या पत्रात आहे.

नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला तेव्हाच त्यांनी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदाची जबाबदारी बेकायदा बळकावली असा आरोप गडकरींनी केला आहे. निविदा रद्द करणे, करोनाच्या काळात कंत्राटी कामगारांचे काम थांबवणे असे निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतल्याचंही या पत्रात गडकरींनी नमूद केलं आहे.

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंढे यांनी स्मार्ट सिटी मध्ये २० कोटींचा घोटाळा केला असाही गंभीर आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला होता. याशिवाय तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिलं असाही आरोप त्यांनी केला होता. त्याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.