मराठा आरक्षण आणि इतर काही आंदोलने यामुळे गेले काही महिने महाराष्ट्रात तणावाचे वातावरण आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यात भर म्हणून आंदोलन नीट हाताळता न आल्याची टीका करत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा भाजपमध्येच रंगल्या असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या काही पहिल्या फळीतील नेत्यांनी मुख्यमंत्री बदलण्याचे वृत्त ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. या दरम्यान, आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.

गडकरी नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल होणार का? या प्रश्नाचे उत्तर दिले. ‘जातीपातीचे राजकारण करून काही लोक (पक्ष) भाजपची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमचा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदल होण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

मागच्या आठ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी माल वाहतूकदारांच्या संघटनेने पुकारलेला देशव्यापी संप शुक्रवारी मागे घेण्यात आला. याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की माल वाहतूकदारांच्या संघटनेने पुकारलेला देशव्यापी संप मिटला याचा मला आनंद आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यात खूप मदत केली. त्यांनी बैठकीत ठरवलेल्या मुद्द्यावर आम्ही नक्कीच काम करू, अशी मी त्यांना हमी देतो.

दरम्यान, ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस’ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये शुक्रवारी दिवसभर झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी रात्री ट्रान्सपोर्ट संघटनेची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली होती असे एआयएमटीसीचे बाल मल्कीत सिंग यांनी सांगितले होते.