केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना करोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी यांनी स्वत:चं विलगीकरण केलं असून आपली प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “काल मला अशक्तपणा जाणवत असल्याने डॉक्टरांशी चर्चा केली. तपासणी केली असता मला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसोबत मी सध्या व्यवस्थित आहे. मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्या आणि प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा”.

राज्यात दिवसभरात २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद
दरम्यान महाराष्ट्रात आज दिवसभरात २३ हजार ३६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या ११ लाख २१ हजार २२१ इतकी झाली आहे. दुसरीकडे ४७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या ३० हजार ८८३ इतकी झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतार्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १७ लाख ५३ हजार ३४७ लोक होम क्वारंटाइन असून ३६ हजार ४६२ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.