आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना करोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो करोना करोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते. मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी त्यांनी या घोषणा त्यावेळी दिल्या होत्या. आता रामदास आठवलेंना करोनाने गाठलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

रामदास आठवले यांना करोनाची लक्षणे नाहीत. कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी काळजी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.  वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खासगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

‘गो करोना चा’ प्रसिध्द नारा देणारे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे झुंझार लढाऊ संघर्ष नायक आहेत. ते करोनावर मात करून नक्की बरे होतील अशी प्रार्थना चाहत्यांची असून ना रामदास आठवले यांच्या पाठीशी पुण्यबळ आहेत. गरिबांचे आशीर्वाद त्यांचे रक्षण करतील. ते करोनावर मात करून पुन्हा गोरगरिबांच्या बहुजनांच्या देशाच्या सेवेत हसतमुखाने हजर राहतील अशी प्रार्थना लाखो चाहत्यांनी व्यक्त केली आहे.