भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची बोलण्याची खास शैली आहे. लोकांना भावणाऱ्या दानवे यांच्या शैलीमुळे आणखी एक मजेशीर किस्सा नाशिकमध्ये घडला. नाशिकमध्ये एका इंग्लिश स्कूलच्या इमारतीचं उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी “मला इंग्रजी येत नाही. मी इंग्रजीत बोललो की, जोक होतो,” अशी स्पष्ट कबूलीच दिली. पण, त्यांच्या या कबुलीनं उपस्थितामध्ये हशा पिकला.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी दानवे यांच्या हस्ते एल.डी. पाटील इंग्रजी मीडियम शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनानंतर रावसाहेब दानवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर इंग्रजीविषयीचा मजेशीर किस्साही सांगितला. दानवे म्हणाले, “मला इंग्रजी येत नाही. मी तोडकीमोडकी इंग्रजी बोलतो. माझं शिक्षण मराठीतून झालं आहे. आमच्याकडं इंग्रजी शाळा नव्हत्या. मी इंग्रजी बोललो तर जोक होतो,” असं त्यांनी सांगितलं. दानवे यांनी ही गोष्ट ऐकून अनेकांना हसू आवरलं नाही.

आणखी वाचा – पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात – रावसाहेब दानवे

मी जम्मू काश्मीरला जाणार-

शाळेतील कार्यक्रमानंतर दानवे यांची पत्रकार परिषदही झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,”लवकरच महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची निवड होईल. राष्ट्रीय अध्यक्षांचीही २० जानेवारीला निवड होणार आहे. मी २२ जानेवारीला जम्मू काश्मीरला जाणार आहे. तेथील लोकांशी चर्चा करणार आहे. त्या लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेणार आहोत. त्यांच्या समस्या सरकारला कळवू. केंद्राचे विशेष लक्ष जम्मू काश्मीरकडे आहे. ज्या योजना पोहोचल्या नाहीत. त्या पोहोचवण्याचं काम सरकार करत आहे,” अशी माहिती दानवे यांनी दिली.