केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे टीकास्त्र

 पुणे : सध्या देशात जातीयवाद, सांप्रदायिकतेच्या नावे वाद उकरून काढले जात आहेत. काही लोकांचे भीती हेच भांडवल आहे. त्यामुळे ते दलित, मुस्लीम समाजामध्ये जाणीवपूर्वक भीती निर्माण करत आहेत. जातीयता, सांप्रदायिकतेचे विष कालवून दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांमध्ये मनात भीती निर्माण करुन त्याचेच राजकारण करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना भाजप बदलणार असा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. मात्र, काँग्रेसने तब्बल ७२ वेळा घटना बदलली आणि आमच्या नावे खडे फोडत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, की विद्यमान केंद्र सरकारने घटना बदलण्याचा एकदाही प्रयत्न केलेला नाही. उलट काँग्रेसनेच आणीबाणीच्या वेळी घटना बदलली आणि आता भाजपच्या नावे खडे फोडत आहेत. पोटनिवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे असतात. मतमोजणीत जोपर्यंत भाजपचा उमेदवार आघाडीवर असतो, तोपर्यंत इव्हीएम यंत्रात गडबड असते आणि बाकीच्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर असतात किंवा निवडणूक जिंकतात तेव्हा इव्हीएमचा विषय बाजूला पडतो.

नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये पंजाब राज्यात काँग्रेस जिंकली, इव्हीएम तेव्हा चांगले होते. भंडारा-गोंदियामध्ये मतदान झाल्यावर इव्हीएममध्ये गडबड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आणि निवडणूक जिंकल्यावर इव्हीएमबाबत चकार शब्द बोलले नाहीत. तसेच पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर इव्हीएम यंत्राबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते.

दर्जेदार रस्ते हवे असल्यास टोल हवाच

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग करण्याआधी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी आठ तास लागत होते. एखादा अपघात झाल्यास हाच कालावधी बारा तासांपेक्षा जास्त लागत होता. चांगले रस्ते झाल्याने नागरिकांचा वेळ, पैसा, इंधन वाचते आणि प्रदूषणही कमी होते. राज्याला टोलमुक्त करु, असे मी कधीही जाहीर केलेले नाही. चांगले महामार्ग, द्रुतगती मार्ग हवे असल्यास त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा लागतो. त्यामुळे चांगले, दर्जेदार रस्ते हवे असल्यास टोल हवाच, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.