वटपौर्णिमेच्या आजच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात महिला वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात मात्र उलटं चित्र पाहायला मिळत आहे. मानवी हक्क संरक्षणच्या वतीने ‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी’ म्हणून चक्क पुरुषांनी हातात दोरा घेऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली आणि आपल्या पत्नीला निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.

पिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवी परिसरात आज अनोखी वटपौर्णिमा पाहायला मिळाली. गेल्या चार वर्षांपासून निरंतर हा अनोखा उपक्रम सुरू आहे. यासाठी श्रीकांत जोगदंड हे अविरतपणे काम सुरू आहे.आज स्त्री, सावित्री जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करते. मात्र, आधुनिक काळातील सत्यवान म्हणजचे आजचे पुरुष यांनी वाजत गाजत वटवृक्षाला दोऱ्याने सात फेऱ्या मारून हीच पत्नी मिळावी यासाठी प्रार्थना करून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. यावेळी अनेक पुरुषांनी या अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. हात पुढे करून सर्व पुरुषांनी हीच पत्नी मिळू दे यासाठी शपथ घेतली. आजच्या आधुनिक युगात केवळ सरकारी कागदावर स्त्री पुरुष समानता दिसते. अशा उपक्रमामुळे समजात नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं बोललं जात आहे. आज फादर दे असल्याने आपल्या वडिलांनी जो उपक्रम सुरू केलाय तो खरंच कौतुस्पद असल्याचे श्रीकांत जोगदंड यांची मुलगी ऋतुजा सांगते. त्यांनी जे पाऊल उचलले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही असं देखील ती म्हणाली.  यामुळे सर्वत्र या पुरुषांचं कौतुक होताना दिसत आहे.