करोनाच्या संकटामुळं लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असल्याने चित्रपटांचे प्रदर्शन ठप्प पडले आहे. मात्र, त्यामुळेच वेब सिरिजची सध्या चलती आहे. या माध्यमात उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ मिळण्यासाठी विद्यापीठांनी युवकांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय वेबिनारप्रसंगी मान्यवरांनी केले.

विद्यापीठाच्या प्रदर्शनकारी कला विभागाच्यावतीने आज ‘सिनेमा शिक्षण, रोजगार आणि आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलतांना कुलगुरू रजनीशकुमार शुक्ल म्हणाले, “विद्यापीठाच्या या कला विभागात चित्रपटाशी संबंधित अभिनय व अन्य बाजूचे शिक्षण देण्यासाठी अद्यावत केंद्र स्थापन करण्याबाबत विचार सुरू आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शासन, सिनेमा उद्योग व दूरचित्रवाणीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.”

व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल, मुंबईचे सुदिप्तो आचार्य म्हणाले, “सिनेमा शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीत असले पाहिजे. नवी दिल्लीच्या डॉ. कुलविन त्रेहन यांनी समाज माध्यमांवर जाहिरात आणि संहिता लेखनात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. वेब मार्केटिंग कम्युनिकेशनच्या व्यासपीठावर असलेली मागणी लक्षात घेवून युवकांनी सज्ज असावे, असेही त्या म्हणाल्या.

सिनेसमिक्षक अनंत विजय यांनी क्लाऊड तंत्रज्ञान, डाटाबेस व नेटवर्किग क्षेत्रात या काळात रोजगार वाढले असल्याचे निदर्शनास आणले. रेडिओची सुध्दा लोकप्रियता वाढल्याने युवकांनी याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. जेष्ठ पत्रकार जगदीश उपासने यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करून शिक्षण संस्थांनी मिडीया योध्दे तयार केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. माध्यमांना ठोस व विश्वासनीय संदेश तयार करणारे युवक हवे असून ही गरज विद्यापीठाने पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री म्हणाले, “भारतीय संस्कृती, कला, साहित्य, योग, आर्युवेद या विषयावर सिनेमा शिक्षण देण्याची गरज आहे.” या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे दर्शन जगाला घडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. सतीश पावडे यांनी वेबिनारची भूमिका मांडली. प्रा. प्रिती सागर व यतार्थ मंजूल यांनी वेबिनारचे सूत्र सांभाळले. या कार्यक्रमात प्र‑कुलगुरू हनुमानप्रसाद शुक्ल आणि प्रा. चंद्रकांत रागीट यांच्यासह संशोधक, सिनेमा प्रेमी विद्यार्थी सहभागी झाले होते.