महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र लेखी परीक्षा मंगळवारपासून संपूर्ण राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा विद्यापीठातील विविध संघटनांद्वारे पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे याआधी स्थगित कराव्या लागल्या होत्या.
स्थगित केलेल्या या परीक्षांच्या वेळापत्रकाचे विद्यापीठाने फेरनियोजन केले. त्यानुसार या लेखी परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षा राज्यातील जवळपास १४५ केंद्रांवर सुरू झाल्या. सुधारित वेळापत्रकानुसार सुरू झालेली ही परीक्षा पदवी अभ्यासक्रम वैद्यकीय विद्याशाखेचे ९५०८, दंत विद्याशाखेचे ३९९०, आयुर्वेद विद्याशाखा ५०४७, युनानी विद्याशाखा ५५९, होमिओपॅथीक विद्याशाखा ९१३८ आणि तत्सम विद्याशाखेचे ३,०८८ असे एकूण ३१,३३० सर्वसाधारण परीक्षार्थी प्रविष्ठ
झाले आहेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदवी परीक्षा सुरळीतपणे सुरू असून सर्व संबंधित महाविद्यालय व परीक्षार्थीनी त्याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाने म्हटले आहे.