पुणे येथून महाबळेश्वरला पर्यटनासाठी जात असताना वाई येथील पाचगणी रस्त्यावरच्या परसणी घाटात एका पर्यटकावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. चार पर्यटकांपैकी एकाचा खून करण्यात आला आहे. हे सगळेजण औंध येथून महाबळेश्वर या ठिकाणी निघाले होते. आनंद कांबळे (वय २६) त्याची पत्नी दीक्षा हे दोघेजण औंध येथील राजेश आणि कल्याणी बोबडे मोटारीने महाबळेश्वरला जात होते. त्यावेळी दीक्षा कांबळे यांना उलटी आली. त्यामुळे १६ नंबर थांब्याजवळ हे सगळेजण थांबले होते.

त्याचवेळी पाचगणीच्या दिशेने आलेल्या चौघांनी दीक्षा कांबळेंवर हल्ला चढवला. त्यांचे दागिने पळवले, त्याच प्रमाणे आनंद कांबळे यांच्यावरही हल्ला केला. आनंद कांबळे आणि दीक्षा या दोघांनाही आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आनंद यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान आनंद यांचा मृत्यू झाला. राजेश आणि कल्याणी बोबडे हे दोघेजण फोटो काढत असतानाच हा प्रकार घडला त्यामुळे घाबरलेल्या बोबडे दाम्पत्याने पोलीस ठाणे गाठले.

आनंद आणि दीक्षा यांचे लग्न २६ मे रोजी झाले होते. आनंद कांबळे यांचा औंध येथे मोटारी आणि दुचाकीच्या नंबर प्लेट तयार करण्याचा व्यवसाय आहे. राजेश बोबडे यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .वाई पोलिसांनी हल्लेखोरांच्या वर्णनावरून तपासासाठी पथके रवाना केली आहेत . अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक वेताळ करत आहेत. पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे तपासावर लक्ष ठेऊन आहेत.