अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कारवर नागपूरमध्ये हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर वाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून हल्ला कोणी केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. हल्ला झाला त्यावेळी आमदार रवी राणा कारमध्ये नव्हते.

अमरावतीमधील आमदार रवी राणा यांच्या कारवर शनिवारी हल्ला करण्यात आला. शनिवारी दुपारी रवी राणा नागपूर विमानतळावर येणार होते. त्यांना घेण्यासाठी राणा यांचा कारचालक आणि काही कार्यकर्ते कारने अमरावतीहून नागपूर विमानतळाकडे जात होते. अमरावती रोडवर वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी कार थांबवली. त्यांनी कारवर दगड फेकला आणि तिथून पळ काढला. या घटनेच्या वेळी राणा कारमध्ये नव्हते. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, रवी राणा हे भाजप समर्थक आमदार असून शुक्रवारी त्यांनी शिवसेनेविषयी महत्त्वपूर्ण विधान केले होते. शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. शिवसेनेचे २० ते २२ आमदार वर्षा बंगल्यावर भाजपत प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला होता. शरद पवारदेखील देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देतील असे राणा यांनी म्हटले होते.