सांगलीतल्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून 20 लाख 60 हजार रुपये किमतीचा खतांचा साठा जप्त केला. यासंदर्भात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही खते शेतकऱ्यांना आणि किरकोळ उत्पादकांना विनापरवाना विकली जात होती.

खरीप हंगामासाठी रास्त दराने गुणवत्तापूर्ण खतं उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना असताना खत विक्रेत्यांनी काही ठिकाणी जादा दराने खत विक्री केल्याची तक्रार उपलब्ध झाली होती. कृषी विभागाच्या ११ भरारी पथकांनी यासंदर्भात गुप्तपणे माहिती जमा केली. जुना बुधगाव रोडवरील ग्लोबल इम्पोर्टस कार्यालयावर छापा घालून सुमारे 20 लाख 60 हजार रुपये किमतीचा बनावट खत साठा जप्त केला. त्याची कोणतीही परवानगी कंपनीकडे उपलब्ध होऊ शकली नाही.

हेही वाचा- ‘वाडा कोलम’कडे वाड्यातील शेतकऱ्यांचीच पाठ

या छाप्यादरम्यान फेरस सल्फेट, सल्फर, मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन, झिंक सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट अशी खतं या भरारी पथकाने जप्त केली आहे. या खतांच्या पावत्या साठवणूक करणाऱ्यांकडे नव्हत्या तसंच खतांची विक्री करण्यासाठी लागणारा परवानाही त्यांच्याकडे नव्हता.

भरारी पथकाने खालीलप्रमाणे माल या छाप्यादरम्यान जप्त केला आहेः

कॅल्शियम नायट्रेट २ टन, सल्फर २ टन, झिंक सल्फेट ४०० किलो, फेरस सल्फेट २ टन, मॅग्नेशियम सल्फेट ५० किलो, बोरॉन २ टन, सिलिकॉन गोळी ५ टन, सिलिकॉन पावडक १० टन, बेन्टोनेट गोळी ३० टन अशी ४ लाख १० हजार ६०० रुपये किमतीची ८४ टन ३५० किलो खते जप्त केली आहेत तर १६ हजारांहून अधिक किमतीचं अन्य साहित्य जप्त केलं आहे. खतांचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.