सततच्या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून माकणी येथील शेतकरी पंडीत साठे यांनी नवा पर्याय शोधला. कमी पाण्यावर हमखास उत्पादन देणाऱ्या ड्रॅगन फळांच्या रोपांची लागवड केली. वर्षभरात वेलीला फळे लगडलेली. मात्र नियतीला हे मान्य नव्हतं, दुष्काळाला पर्याय म्हणून निवडलेला हा पर्यायच अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेला. पंडीत साठे यांनी अवर्षणाच्या आगीत सावरण्यासाठी लाखो रुपयांची भांडवली गुंतवणूक केली मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास पळवून नेल्याने त्यांच्यासमोर आता संकट निर्माण झालं आहे. दुष्काळी परिस्थितीतून ओल्या दुष्काळाच्या फुफाट्यात पडल्याची भावना यावेळी शेतकरी पंडीत साठे यांनी बोलून दाखवली.

उस्मानाबाद जिल्ह्यात ड्रॅगन फ्रूटची शेतीची मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका आदी देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाला आता स्थानिक बाजारातही मागणी वाढत आहे. दुष्काळी भागात कमी पाण्यावर बहरणाऱ्या या फळबागेकडे शेतकरी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहू लागले आहेत. लोहारा तालुक्यातील माकणी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडीत साठे यांनी एक हेक्टर शिवारात वर्षभरापूर्वी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथून ड्रॅगन फळांची रोपे आणून त्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळेल या विश्वासावर त्यांनी फळबाग जोपासली. वर्षभरात वेलीला फळधारणाही चांगली झाली. उन्हाळ्याच्या तडाख्यात मोठ्या परिश्रमाने त्यांनी बागेची काळजी घेतली. संपूर्ण बागेत ठिबक सिंचनाची व्यवस्था केली, जातीने लक्ष दिले. बाग जोपासण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र उत्पादन सुरू होण्यापूर्वीच मागील आठवड्यात आलेल्या अतिवृष्टीने सगळा खर्च पाण्यात वाहून गेला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांत सुमारे १८०० एकरावर सध्या ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे. त्यात वाढ होऊन १८ हजार एकरावर पोहोचली तरी ड्रॅगन फ्रूटचे भाव केवळ ५० टक्क्यांनी पडतील. त्यामुळे हमखास उत्पन्नाचा स्रोत म्हणून खिशातले सात लाख रुपये खर्च करुन साठे यांनी लागवड केली. पहिल्या वर्षी एका वेलीला १० ते १५ किलो फळे येतात. जून ते ऑक्टोबर हा काळ ड्रॅगन फ्रूटचा बहराचा काळ असतो. पहिल्या वर्षी साधारणपणे १०० रुपये किलो भाव गृहीत धरला तरी दोन लाखाचे उत्पादन होते. दुसऱ्या वर्षीपासून सहा टन उत्पादन म्हणजे ६ लाख रुपयाचे तर तिसऱ्या वर्षी १५ टनांपर्यंत उत्पादन वाढू शकते. एकदा लागवड केलेली वेल साधारणपणे ३० वर्षे टिकते, त्यामुळे तितके वर्षे उत्पन्नाची हमी. मात्र अतिवृष्टीमुळे माकणी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आणि पुढील तीन दशकांच्या उत्पन्नाची स्वप्न पाहणाऱ्या साठे यांच्या ड्रॅगन शेतीचे क्षणात होत्याचे नव्हते झाले.

तीस लाखाहून अधिक नुकसान –

सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून पंडीत साठे यांनी लागवड केली. भविष्यात त्यातून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. फळबागेसह शेतातील उडीद, ठिबकचे संच, जनावरांचा गोठाही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. जमिनीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. पदरात आलेले पीक एका रात्रीत नाहीसे झाले आणि सेवानिवृत्तीनंतर मिळालेली सगळी रक्कमही पाण्यात गेली. तीस लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. पुढील दहा वर्षांतही हे नुकसान भरून निघू शकणार नाही असे सांगत असताना उतारवयाला लागलेल्या पंडित साठे यांचा गळा भरून आला होता.