एक चित्रपट बुडाला तर काही कोटी रूपये बुडीत खाती जमा होतात. त्या पाश्र्वभूमीवर सरकारकडून साहित्य संमेलनाला होणारी २५ लाख रूपयांची मदत ही किरकोळ बाब आहे, मात्र त्याचा डांगोराच फार पिटला जातो, असे स्पष्ट मत चिपळूण येथे जानेवारीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
बीडहून पुण्याला जाताना नगरमध्ये कवी लहू कानडे यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबलेल्या कोत्तापल्ले यांनी निवडक पत्रकारांबरोबर अनौपचारिकपणे संवाद साधला. त्यात त्यांनी अनेकविध विषयांवर मते व्यक्त केली. संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर आपल्याला काही वाद निर्माण करायचा नाही असे स्पष्ट करून कोत्तापल्ले यांनी,‘‘ राजकारण्यांची मदत संमेलनासाठी घेणे न घेणे ही बाब किरकोळ आहे; तुम्ही त्यांना ठामपणे काही सांगू शकता का हे महत्त्वाचे आहे,’’ असे मत व्यक्त केले.
जागतिकीकरणामुळे फक्त साहित्यिकच काय, सगळा समाजच आत्मकेंद्रित झाला आहे. समाजातील चळवळी लुप्त झाल्या आहेत, त्यामुळेच सामाजिक विषयांवर साहित्यिक बोलत नाही. हे खरे असले तरी समाजातील कोणीच काही बोलत नाही हे खरे वास्तव आहे. पुन्हा, फक्त साहित्यिकांनीच का बोलायचे, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. मुळात ज्यांच्यावर अन्याय होतो, ज्यांना त्रास होतो ते काहीच बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत. वेळ आली तर जातीपातीचा, पैशाअडक्याचा संदर्भ लावत अन्याय करणाऱ्यांच्याच मागे उभे राहतात, त्यातून समाजात एक प्रकारचा अदृश्य दहशतवाद निर्माण झाला आहे, असे निरीक्षण कोत्तापल्ले यांनी नोंदवले.