गोंदिया जिल्हा परिषदेने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जलदगतीने आणि पारदर्शक, तसेच पेपरलेस काम व्हावे, याकरिता विविध यंत्रसामग्री गेल्या तीन ते चार वर्षांत खरेदी केली; परंतु यातील काही प्रकल्प बंद पडले आहेत. सुमारे ३० लाख रुपयांची खरेदी यासाठी करण्यात आली. जिल्हा निधीतून लोकोपयोगी कामे करण्यात आली असती तर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद प्रशासनाने लोकांच्या मनात जागा निर्माण केली असती, असा सूर उमटू लागला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनातील लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारमुक्त आणि कमी पशात उत्तम आणि जास्तीत जास्त कामे करण्यावर भर देत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न येथील अधिकाऱ्यांच्या साहेबगिरीमुळे धुळीस मिळत आहेत. भ्रष्टाचारास आळा घालण्यास सपशेल जिल्हा परिषदेला अपयश आले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामे लवकर मार्गी लागावी, याकरिता अमुक केले तमुक केले म्हणून ते सांगण्यास विसरत नाही; परंतु प्रत्यक्षात कामे रेंगाळलेलीच आहेत. विकासाला खीळ बसल्याचे वर्षभरापासूनचे चित्र आहे. कामात सुसूत्रता आणि गती यावी, याकरिता जिल्हा परिषदेने सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च करून वायफाय यंत्रणा सुरू केली. आठ लाख रुपये किमतीचा सव्‍‌र्हर खरेदी करण्यात आला. शाळांवर देखरेख ठेवता यावी, नियंत्रण ठेवून माहिती संकलित करण्याकरिता विश्वास प्रकल्प राबविण्यात आला. काही काळानंतर या प्रकल्पाचे नामकरण शाळांवर देखरेख व नियंत्रण आणि माहिती संकलन सॉफ्टवेअर व संच, असे करण्यात आले. मात्र, सुरू होण्याआधीच हे प्रकल्प बंद पडले. या प्रकल्पाकरिता पाच लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.
त्यासह कर्मचाऱ्यांनी कार्यालयात दांडी मारू नये, याकरिता थंब मशिन खरेदी करून प्रशासकीय इमारतीच्या दालनात बसविण्यात आल्या. मशिन खरेदीसाठी  १० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. त्या मशिन पडून आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कक्षात बोलावून त्यांची हजेरी नोंदवितात. याउलट, येथील बहुतांशी विभागप्रमुख आणि अधिकारी विदर्भ एक्स्पेसने दुपारी १२ वाजता कार्यालयात येत असताना त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची साधी कल्पनाही कुणाला आली नाही. डाक तिकिटांची मारामार थांबावी, याकरिता अडीच लाख रुपयांतून ई-डाक तिकीट मशिन खरेदी करण्यात आली. तीही बंद पडली. सध्या ती एका खोलीत कोपऱ्यात पडून आहे. हा सावळागोंधळ होत असताना स्वच्छ प्रतिमा आणि गतिमान प्रशासनाची धडपड बाळगणारे अधिकारी मात्र गप्प का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. निधी खर्च करून कोणतीही सोयीची वस्तू खरेदी करण्यात आली असल्यास ती उपयोगात येणे गरजेचे आहे. थंब मशिन वा इतर साहित्य बंद असल्यास त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून त्यात सुधारणा करावी, असे गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांनी बोलताना सांगितले.

साऱ्यांचच उपस्थितीवर लक्ष -शिंदे
वायफाय व सव्‍‌र्हरबद्दल कालपर्यंतची स्थिती काही वेगळी असू शकेल. मात्र, आज संपूर्ण जिल्हा परिषदेतील वायफाय व सव्‍‌र्हर सुरू आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. डेटा कलेक्ट करून इन्स्टालेशन करावे लागते. यात थोडी फार अनियमितता येऊ शकते. ई-डाक तिकीटबद्दल मला काही माहिती नाही. मात्र, थंब मशिनी येथील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने स्केचिंग करीत असल्यामुळे बंद पडलेली आहेत. त्याची पर्यायी व्यवस्था सुरू आहे. सोबतच माझी येथील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या येण्या-जाण्यावर संपूर्णपणे लक्ष असल्याचे सीईओ डी.डी. िशदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले.