१५ वर्षांपासून पगार न मिळाल्याने एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील गोंदियामध्ये ही घटना घडली आहे. केशव गोबडे असे या शिक्षकाचे नाव आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच या शिक्षकाने त्याचे आयुष्य संपवले. केशव गोबडे हे गेल्या काही वर्षांपासून एका माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. या शाळेला सरकारचे अनुदान मिळाले नव्हते. त्याचमुळे पगारही अडला होता. एक ना एक दिवस शाळेला अनुदान मिळेल आणि आपला पगार होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरल्याने त्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं

सहा वर्षांपूर्वी गोबडे यांची पत्नी आणि मुलंही त्यांना सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले. आता कधीतरी जीआर निघेल आणि सगळं काही सुरळीत होईल अशी आशा त्यांना होती. मात्र सरकारकडून दीरंगाई होत राहिली. अखेर त्यांनी गुरुवारी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच विष पिऊन आत्महत्या केली आणि आपले आय़ुष्य संपवले. ज्या शाळांना अनुदान मिळत नाही त्या शाळेतल्या शिक्षकांची कशी अवस्था होते तेच या उदाहरणावरुन समोर आले आहे. थोडीथोडकी नाही तब्बल १५ वर्षे वाट पाहिल्यानंतर अस्वस्थ झालेल्या गोबडे यांनी विष पिऊन त्यांचं आयुष्य संपवलं.