वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या बल्लारपूर क्षेत्रात आज सुरू झालेल्या कामगारांच्या तीन दिवसीय संपाच्या पहिल्या दिवशी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. बल्लारपूर क्षेत्रातील सर्व आठ कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक व तीन उपक्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय दवाखान्यासह सर्व कार्यालयात आज पूर्णपणे शुकशुकाट होता. आजचा बंद काळात कामगार घरूनच निघाले नाही, त्यामुळे सर्वत्र शांतता होती.

केंद्र सरकारने कोळसा उद्योगात कमर्शियल मायनिंगचा निर्णय घेऊन त्यांचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला. याविरुद्ध कोल इंडिया स्तरीय सर्व पाचही कामगार संघटनांनी जोरदार विरोध करीत हा निर्णय परत घेण्याची मागणी केली. परंतू सरकारने हा निर्णय परत न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलट कमर्शियल मायनिंगचा स्वतः शुभारंभ केला. यामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनांनी २ ते ४ जुलै असा तीन दिवसीय संप घोषित केला.

आजच्या पहिल्या दिवशी या संपाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बल्लारपूर क्षेत्रातील ४,२०० कामगार आज संपात सहभागी झाले. याशिवाय ठेकेदारीचे पाच हजार कामगार आज कामावर आले नाहीत. कोळसा खाण क्षेत्रातील क्षेत्रातील मातीच्या उत्खनन करणाऱ्या खाजगी कंत्राटी कंपन्यांतील उत्खनन आज पूर्णपणे बंद होते. विशेष म्हणजे घोषीत असलेल्या अत्यावश्यक सेवा विद्युत, पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा यामध्ये काम करणारे कर्मचारी आज व्यवस्थापनाच्या आदेशाला न जुमानता संपात सहभागी झाले. क्षेत्रीय दवाखान्यात आज एकही कामगार अथवा त्यांच्या परिवारातील कुणीही उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात आले नाही.

कामगारांच्या संपाच्या इतिहासात असा प्रकार व एवढा कडकडीत बंद पहिल्यांदा अनुभवास आला. आज प्रथम व द्वितीय पाळीत हा बंद पूर्णपणे यशस्वी झाला. रात्र पाळीत एकही कामगार कामावर येऊ नये, यासाठी कामगार पदाधिकारी दक्षता बाळगत आहेत.