शासकीय रुग्णालयातील अधिकारी विनाकारण गैरहजर असल्याने  यंत्रणेवरील ताण वाढला, अन्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी

पालघर : जिल्ह्यतील करोना रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात असताना शल्य चिकित्सक अंतर्गत असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये सहा अधिकारी अनधिकृतपणे गैरहजर किंवा अध्ययन रजेवर गेले आहेत. त्यामुळे यंत्रणेवरील ताण वाढला आहे.  अधिकारी नसल्याने सेवा देण्यास मर्यादा येत आहेत. सद्यस्थितीत अशा अधिकाऱ्यांऐवजी बदली वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी  मागणी जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा विभागाच्या संचालकांकडे केली आहे.

पालघर जिल्ह्यत पालघर, बोईसर, विक्रमगड, वाडा, मोखाडा व तलासरी येथे ग्रामीण रुग्णालय असून डहाणू, कासा व जव्हार येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहेत. करोना संक्रमणाच्या स्थितीत डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी तसेच जव्हार उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय वाडा येथील प्रत्येकी एक अधिकारी अनधिकृतपणे गैरहजर राहिले आहेत. त्यांच्या सेवा समाप्तीचे प्रस्ताव संचालकांकडे पाठवण्यात आले आहेत. या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेऊन त्यांच्या जागी नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

त्याचप्रमाणे विरार येथील ग्रामीण रुग्णालयातही  एक अधिकारी अनधिकृतरीत्या गैरहजर असून उपजिल्हा रुग्णालय कासा वैद्यकीय अधिकारी अध्ययन रजेवर गेले आहे. त्यांच्याऐवजी अन्य वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची  मागणीदेखील जिल्हा प्रशासनाने आरोग्यसेवा संचालकांकडे केली आहे.

जिल्ह्यत वाढत्या रुग्ण संख्येकडे पाहता नव्याने समर्पित करोना रुग्णालय तसेच करोना उपचार केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. अपुरे मनुष्यबळ असल्याने या विस्तारामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद करून याकामी आरोग्य विभागाने या विषयावर तातडीने निर्णय घ्यावा,  अशी विनंती  केली आहे.

भंगार साहित्याने जागा व्यापली

जिल्ह्यतील ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय आवारात तसेच रुग्णालयामधील विविध खोल्यांमध्ये अनेक वर्षे जुने भंगार व साहित्य साठवून ठेवण्यात आले आहे. त्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे या भंगार साहित्याने जागा व्यापली जात असून हे जुने साहित्य भंगार विकण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.  साहित्य मोकळे केल्यास त्या ठिकाणी अतिरिक्त रुग्ण सेवेसाठी खाटांची सुविधा करता येईल याकडे संचालकांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

जुन्या इमारतीच्या जागेत प्राणवायू उत्पादन केंद्र

वैद्यकीय शिक्षण विभागअंतर्गत असलेल्या आरोग्य पथक व माता बाल संगोपन केंद्राच्या आवारात असलेल्या व मोडकळीस आलेल्या जुन्या कर्मचारी इमारतीला जमीनदोस्त करून त्या ठिकाणी एका दात्याकडून प्राप्त होणारे प्राणवायू उत्पादन केंद्र उभारण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विचार करीत आहे.  यासाठी मोडकळीस आलेली इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात येतील,  असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.