द्राक्षाचे मणी निखळले की बुरशीची वाढ होते. गारपीट झाली आणि मणी गळू लागले. फुलोऱ्यात असणाऱ्या मोसंबीची फूलगळ झाली. काढणीस आलेले ज्वारीचे पीक आडवे झाले. टरबूज पिकासही गारपीट हानिकारक ठरली. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे जालना जिल्ह्य़ातील सुमारे २८ हजार हेक्टरवरील जिरायत, बागायत आणि फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. हा अहवाल प्राथमिक स्वरूपातील असल्यामुळे बाधित क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. प्राथमिक अहवालानुसार २७ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रातील पिके ३३ टक्क्य़ांपेक्षा अधिक बाधित झालेली आहेत.

या अहवालानुसार १० हजार ७३२ हेक्टर जिरायत, १४ हजार ७२४ बागायत आणि २ हजार ५०५ हेक्टरवरील फळपिके ३३ टक्क्य़ांपेक्षा अधिक बाधित झाली आहेत.

पिकांचे पंचनामे करण्याचे काम आठवडाभरात पूर्ण व्हावे यादृष्टीने प्रशासन प्रयत्नात आहे. पिकांच्या नुकसानीचा सध्याचा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून पंचनाम्यानंतर त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी