24 January 2019

News Flash

सनईच्या मंगलध्वनीऐवजी शेतकऱ्यांच्या घरांत नीरव शांतता

पाणवलेले अनेक शेतकरी सध्या मराठवाडय़ात जागोजागी दिसत आहेत.

नातीचं लग्न आठवडय़ावर आलेलं.. २० फेब्रुवारीला होणाऱ्या तिच्या लग्नाची वर्षभरापासून तयारी सुरू होती. त्यासाठी तिच्या बापासह भाऊही दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून राबू लागले. दोघांनीही उचल घेऊनच काम सुरू केले होते. त्याच पैशातून लग्नाची खरेदी केली. हे सारे केले ते दोन एकरात लावलेल्या गव्हाच्या भरवशावर. पण सोमवारच्या गारपिटीने या साऱ्या मनसुब्यावर पाणी फेरले. ‘मंगल कार्या’ची घडी विस्कटून गेली.. औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकरी सखाराम राघोजी धनवे डोळ्यांत पाणी आणून हे सांगत होते. असे डोळे पाणवलेले अनेक शेतकरी सध्या मराठवाडय़ात जागोजागी दिसत आहेत. यातील सर्वानाच गारपिटीने मारले आणि मंगलकार्याचा आनंदध्वनी दोन दिवसांतच नीरव शांततेत बदलून गेला.

सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील गणेशराव पाचपिले यांची. गणेशराव यांचा मुलगा प्रसाद व मुलगी पल्लवी यांचा १७ फेब्रुवारीला साखरपुडा आहे. त्यांनी २ हेक्टर ४०-आरमध्ये पेरलेला गहू आणि चार एकरमधील हरभऱ्याच्या आशेवर लग्नाची तयारी चालवली होती. प्रसादचे लग्न १७ एप्रिलला तर मुलीचे लग्न २ मे रोजी निश्चित झालेले आहे. आता या दोघांचे लग्न कसे करावे, असा यक्षप्रश्न समोर उभा राहिला आहे, असे गणेशराव पाचपिले सांगत होते.

रविवारी, सोमवारी जिल्हाभर अवकाळी गारांसह पाऊस झाला. जिल्ह्य़ातील आडगाव रंजे, पोतरा, वारंगा फाटा, बनबरडा, ताकतोडा, कुरुंदा, खुडज, येहळेगाव, शिरडशहापूर, औंढा नागनाथ कडोळी, बासंबा, करंजी आदी ठिकाणी गारांसह पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. हवामान खात्याने तीन दिवस गारांसह पावसाची शक्यता वर्तवली होती. ती खरी ठरली आणि सोमवारीसुद्धा जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी गारांसह आवकाळी पाऊस झाला.

नक्की अडचण काय?

या वर्षी खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडले. हमीभाव केंद्रावर विकलेल्या मालाचा दर शेतकऱ्यांना वेळेत मिळाले नाही. त्यातच जिल्हाभर कापसावर बोंडअळीने घाला घातला. शेतकऱ्यांचा आधार रब्बी पिकावर असताना हातातोंडाशी आलेले पीक दोन दिवसांच्या गारांसह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतकरी आधीपासूनच अडचणीत असताना अवकाळी पावसाने त्यावर घाला घातला. आता शासन दरबारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील. आधीच कापसाच्या बोंडआळीची दमडीसुद्धा मिळाली नाही. तेव्हा झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्याला (पान ८ वर)

लग्न-विघ्न

हिंगोली जिल्ह्य़ात झालेल्या गारपिटीने शेतीचेच नाही, तर शेतकरी आणि त्यांच्या लग्नाच्या वयातील मुला-मुलींच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नामध्ये गारपिटीमुळे आर्थिक प्रश्न निर्माण होणार आहेत. एकीकडे पिकांचे नुकसान तर दुसरीकडे घरात असलेल्या उपवर-वधूंच्या अवस्थेतील मुलामुलींच्या लग्नाचा विचारही यामुळे थांबणार आहे. अनेकांनी याच वर्षांत मुलगा-मुलीचे लग्न करण्याची तयारी केली होती. त्यावर गारपिटीने शेती नुकसान करून पाणी फेरले आहे.

First Published on February 14, 2018 3:55 am

Web Title: unseasonal hailstorm effect marriage