रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची धूळधाण झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री  सुरू झालेल्या वादळी पावसाने काजू व वाल ही पिकांचे नुकसान झाले आहे, तर वीटभट्टी व्यवसायही अडचणीत आला आहे. जिल्ह्यात अनेक भागांत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड, पेण या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. वादळीवाऱ्यांमुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक ८४.६ मि. मी. मावसाची नोंद झाली. आंबा बागायतदार थंडीच्या प्रतीक्षेत तर दुसरीकडे भातपिकाच्या कापणीनंतर वाल आणि इतर कडधान्याच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्य़ातील वाल, पांढरा कांदा, किलगड, यांसारख्या पिकांची पेरणी सुरू आहे. खरिप हंगामातील कापणी झालेले भात अद्याप शेतात आहे. कापून ठेवलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार आहे. हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. रायगड जिल्ह्य़ातील आंबा पिकाचेही या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या मोहोर येण्याचे प्रमाण कमी असले तरी असलेला मोहोर नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.