सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्य़ातील अनेक भागांत पुन्हा तडाखा दिल्यामुळे ऑक्टोबर छाटणीतील द्राक्षबागा तसेच डाळिंब, कांदा व भाताचे मोठे नुकसान झाले. जळगावमध्ये या पावसाने कापूस, ज्वारी व मका पिकांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. शहर व परिसरात सातत्याने अवकाळी पाऊस कोसळत आहे. शनिवारचा दिवसही त्यास अपवाद राहिला नाही. दुपारच्या सुमारास त्याने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी कापणी करून शेतात ठेवलेला मका, बाजरी भिजले. लागवड झालेल्या कांद्यावर रोगराई पसरण्याची धास्ती आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. शेतातील उभ्या भात पिकासह खळ्यात साठवण करून ठेवलेले धान्य भिजले. नुकसानग्रस्त भात पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पावसामुळे भात पिकाची कापणी करता येत नाही. शेतात पाणी साचत असल्याने ते सडण्याची भीती आहे. यामुळे अनेक गावांतील भात पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जनावरांचे खाद्य असलेले वैरण भिजल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. देवळा, चांदवड, बागलाण व नांदगाव आदी भागांत अवकाळी पावसाने कांदा, मका व सोयाबीनचे नुकसान केले. शेकडो हेक्टरवरील डाळिंब बागांचे नुकसान झाले. शनिवारी दिंडोरी तालुक्यात वीज कोसळून मीराबाई महाले (२५) यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिकप्रमाणे जळगाव जिल्ह्य़ात अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. चाळीसगाव, पाचोरा, पारोळा व धरणगाव या चार तालुक्यांत अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे खरीपसह रब्बी पिकांचेही नुकसान झाले. रात्रभर संततधार असल्याने ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपयांचा मका ओला झाल्याने नुकसान झाले. कापूस, दादर या पिकांचे नुकसान झाले. इतर तालुक्यांतही पावसाने हजेरी लावल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.