News Flash

अवकाळी तडाखा!

अवकाळी पावसाच्या तडाख्यात रब्बीच्या पिकांवर संकट निर्माण केले आहे.

| November 16, 2014 06:50 am

पावसाळय़ाच्या चार महिन्यांत राज्यातील अनेक भागांत झालेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाचा हंगाम वाया गेला असतानाच आता अवकाळी पावसाच्या तडाख्यात रब्बीच्या पिकांवर संकट निर्माण केले आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय ढगाळ वातावरणामुळे उभ्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. राज्याच्या कृषी विभागाने मात्र, या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाला फायदा होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
यंदा  बहुतांश  भागांत ऑगस्ट, सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात पावसाने विशेष हजेरी लावली नाही. त्यामुळे संपूर्ण मराठवाडय़ासह राज्याच्या तब्बल १२५ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. दुष्काळी भागातील शेतीला या पावसामुळे संजीवनी मिळाली असली तरी अन्यत्र मात्र अवकाळी पावसाचा विपरित परिणाम पाहायला मिळत आहे. शेतातच कापणी करून ठेवलेले धान्य पावसामुळे वाया जाणे, ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव, द्राक्षबागांवरील संकट, काढणीला आलेल्या भात व सोयाबीन या पिकांचे नुकसान, ऊसतोडणीमध्ये खंड अशा अनेक गोष्टींनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसांतही राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे पुढील आठवडय़ातही कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान व पावसाच्या तुरळक सरी असे वातावरण असेल. त्यामुळे थंडीच्या आगमनासही विलंब होईल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
वीज कोसळून दोघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्य़ातील मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथे वीज कोसळून शेतकरी सिध्दार्थ प्रल्हाद डोंगरे (३२) यांचा मृत्यू ओढवला. खामगाव तालुक्यातील टाकळी तलाव शिवारात वीज कोसळून चार मेंढय़ा जागीच दगावल्या, तसेच मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथील संजय आत्माराम कडसे यांच्या गायीचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्य़ात दिंडोरी तालुक्यात शनिवारी मिराबाई महाले (२५) या महिलेचाही वीज कोसळून मृत्यू झाला.
आताच्या पावसाचे कारण काय?
नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणे अपवादात्मक नाही. या दिवसांत दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळमध्ये ईशान्य मान्सूनचा पावसाचा जोर असतो. आता या वाऱ्यांचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात लक्षद्वीपपासून ते दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र तसेच, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे.

रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत त्या भागात मातीत फारशी ओल नव्हती. या पावसामुळे ती वाढेल आणि पिकांना फायदा होईल.काही ठिकाणी रब्बीच्या पेरण्या पुन्हा होऊ शकतील. त्याचा हरभरा, करडी, जवस या पेरण्यांना फायदा होईल. ज्यांनी खरिपाच्या कापूस, तूर अशा पिकांची उशिरा पेरणी केली. त्यांनाही हा पाऊस फायद्याचा आहे. मात्र, भात, सोयाबीन ही पिके काढणीला आलेली असल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते.
– उमाकांत दांगट, राज्याचे कृषी आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:50 am

Web Title: unseasonal rain damage crops in maharashtra
टॅग : Unseasonal Rain
Next Stories
1 खंडाळ्याजवळ अपघातात ८ ठार
2 महाराष्ट्राचे आता कसे होणार?
3 दर्डाचे चहापानाचे निमंत्रण शहांनी धुडकावले!
Just Now!
X