जिल्ह्णाात अवकाळी पावसाने रविवारी पुन्हा झोडपून काढल्याने पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले असून शेतकरीवर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले आहेत.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात तीन दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्णाास झोडपून काढले. दोन दिवसांपासून जिल्ह्णाात सूर्याने दर्शन दिलेले नाही. रविवारी सायंकाळी जिल्ह्णाात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसास सुरूवात झाली. पावसाचा वेग प्रचंड असल्याने रस्ते क्षणार्धात सूनसान झाले. दिंडोरी, वणी, ओझर, पिंपळगाव, मालेगाव, सटाणा, नामपूर, सिन्नर तालुक्यातील अनेक गावे असा सर्वदूर पाऊस झाला. या पावसाने द्राक्षबागांचे अधिक नुकसान होण्याची भीती आहे.
बहुतांश बागा या फुलोऱ्यावर आलेल्या असताना पाऊस होत असल्याने नुकसानीचा आकडा कित्येक कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यातच असे वातावरण डावण्या या रोगास पूरक असल्याने त्याचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून द्राक्ष उत्पादकांना महागडी औषधे फवारणे भाग आहे. मालेगाव तालुक्यात तर दोन दिवसापूर्वीच्चा पावसाने बाजरी, कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब अशा सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक घरांच्या भिंती कोसळल्या असून ठिकठिकाणी विद्युत खांबही वाकले आहेत.
धुळे जिल्ह्णाातील साक्री व परिसरातही रविवारी पावसाने हजेरी लावली.  दरम्यान, शेतमालाचे झालेले कोटय़वधी रुपयांचे नुकसान पाहता दिरंगाई न करता युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. गारपीट, दुष्काळी परिस्थिती तसेच तेल्या, मर, करपा आदी विविध पिकांवरील रोगांमुळे जिल्ह्य़ातील शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात अवकाळी पावसाने द्राक्ष, भात, टोमॅटो, डाळिीब, मका, बाजरी, सोयाबीन आदी हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बीतील कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला ही पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता हे पंचनामे करण्यात दिरंगाई होऊ नये व सरसकट सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत म्हणजे शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल असेही निवेदनात अ‍ॅड. पगार यांनी म्हटले आहे.