शहरासह ग्रामीण भागात शनिवारी पुन्हा एका अवकाळी पावसाचा शिडकावा झाल्यानंतर वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला. वर्षभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने द्राक्षासह इतर पिकांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्ष काढणीचे काम प्रगतिपथावर असताना अचानक पाऊस झाल्याने उत्पादक धास्तावले आहेत.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून थंडी अंतर्धान पावल्यानंतर उन्हाचे चटके जाणवू लागले होते. आदल्या दिवशी निरभ्र असणारे आकाश शनिवारी सकाळी ढगाळ बनले. दुपारी दीड वाजता शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. निफाड, लासलगाव, सायखेडा, वणी, कळवण आदी ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. सलग काही तास रिमझिम स्वरूपात सरी बरसत राहिल्या. याचा परिणाम कमालीचा गारठा निर्माण होण्यात झाला. अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली. सायंकाळी घराबाहेर पडणाऱ्यांना उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागला. हा पाऊस आणखी काही दिवस कोसळत राहिल्यास द्राक्ष पिकाला सर्वाधिक फटका बसणार असल्याची उत्पादकांची प्रतिक्रिया आहे. हिवाळ्यानंतर द्राक्षांची देशांतर्गत मागणी वाढते. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी द्राक्ष काढणीचे काम वेगात सुरू आहे. त्याच वेळी पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाल्याचा परिणाम द्राक्षांवर होणार असल्याचे सांगण्यात आले.