नोव्हेंबर महिना म्हणजे कडाक्याच्या थंडीचा. मात्र या दिवसांतही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील काही भागात हजेरी लावली असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुण्याच्या मावळमध्ये याच अवकाळी पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. मावळ परिसरातील काही भागात जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकटासह झालेल्या या पावसाने परिसराला चांगलेच झो़डपून काढले. या पावसाने परिसरातील भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

दोन दिवसांपूर्वीही राज्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस पडला होता. रत्नागिरी, परभणी, लातूर, सांगली, पंढरपूर आणि कोल्हापूर येथे मुसळधार पाऊस पडला. तर, राज्यभरात सर्वत्र ऊन आणि नंतर ढगाळ वातावरण होते. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्य़ात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने रब्बी पिकांना फटका बसला होता. सांगलीतील द्राक्ष उत्पादकही या अवकाळी पावसाने चिंतेत सापडला होता. सुगीच्या काळात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. सांगली, सोलापूरमध्येही पावसाने हजेरी लावली. यामुळे साखर कारखान्यांच्या ऊसतोडीही थांबल्या होत्या.