गेल्या काही दिवसांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या विदर्भात गुरूवारी पावसाने हजेरी लावली. विदर्भातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस झालेला पहायला मिळाला. सध्या विदर्भात सर्वदूर पाणीटंचाई असून तापमानाचा पाराही वाढला आहे. दुष्काळाची होरपळ आणि त्यात वाढत्या तापमानामुळे विदर्भातील जनता त्रस्त झाली होती. मात्र, आजच्या पावसाने लोकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला. आज राज्यात बहुतेक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेले असून, तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत बुलडाणा, धुळे, चिखली, नांदेड, जुन्नर, खटाव तालुका आदी भागांत पाऊस झाला. येत्या सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.