कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. रत्नागिरीतील चिपळूण आणि गुहागर तर रायगड जिल्ह्य़ातील महाड, पोलादपूर, कर्जत आणि खालापूर तालुक्यांना वादळी पावसाने शुक्रवारी झोडपून काढले. झाडावर कोसळलेल्या विजेच्या तारेचा झटका लागून चिपळूण येथे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर गुहागर तालुक्यात अनेक झाडे उन्मळून पडली. दरम्यान, येत्या २४ तासात कोकण किनारपट्टीवर काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सह्य़ाद्रीच्या रांगांलगतच्या परिसरात शुक्रवारी वादळी पावसाने हजेरी लावली, तर रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिपळूण, गुहागर, लांजा आणि राजापूर तालुक्यांत वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे आंबा आणि काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक वृक्ष उन्मळून पडले आणि विजेचे खांब उखडून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला. चिपळूण शहरातील मापारी मोहल्ला येथे झाडावर कोसळलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून शाहीन फाइक उंडरे (१४) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुहागर तालुक्यालाही वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यामुळे अनेक ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडले, नारळ, पोफळीच्या बागांचेही नुकसान झाले असून पंचनामे सुरू करण्यात आले.

रायगडातही गारपीट
रायगड जिल्ह्य़ातील महाड, पोलादपूर तालुक्यांना गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपले, तर कर्जत, माथेरान आणि खालापूर तालुक्यात शुक्रवारी दुपारनंतर वादळी पावसासह गारपीट झाली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, तीन महिन्यांत तिसऱ्यांदा आलेल्या अवकाळी पावसाने आंबा, काजू बागायतदारांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही धुळीला मिळाल्या आहेत. यंदाच्या हंगामात साधारणपणे चाळीस ते पन्नास टक्के आंबा पीक हाताशी लागण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

मार्चमध्ये पहिल्यांदाच..
दोन दिवस आभाळात दाटी केलेल्या ढगांमुळे शुक्रवारी मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. भांडुप, मुलुंड, कुर्ला या भागांत सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. गेल्या सात वर्षांत मुंबईत पहिल्यांदाच मार्चमध्ये पाऊस पडला आहे. लक्षद्वीप ते मध्य प्रदेशपर्यंतच्या पट्टय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ऐन मार्चमध्ये गारपीट, पाऊस पडत आहे. मात्र, मार्चमध्ये प्रचंड तापमान व बाष्प यामुळे पाऊस पडण्याची घटना दुर्मीळ नाही, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवसही आकाश अंशत: ढगाळ राहणार असले तरी पावसाची शक्यता नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कुलाबा येथे कमाल ३२.८ अंश से. तर किमान २७ अंश से. तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३३.१ अंश से. व २५.८ अंश से. तापमान होते, मात्र हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने उकाडा असह्य़ झाला आहे.