दुष्काळाने व गारपिटीने अगोदरच त्रस्त झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने पुन्हा झोडपले. बुधवारी पहाटे झालेल्या वादळी पावसाने संत्रा, गहू, हरभरा, कांदा यासह रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दशकानंतर मोठय़ा प्रमाणात बहरलेल्या आंब्याचा मोहोर वादळी पावसाने गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली.
विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने शहरातील काही भागांमध्ये पडझड झाली. वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या. वीज पुरवठाही काही काळ खंडित झाला. अमरावती जिल्ह्यातील विविध भागात मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. रात्री अवकाळी पावसाने शहर चिंब भिजले. ग्रामीण भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरूड, तिवसा, अचलपूर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील अनेक भागात गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे गहू जागेवरच झोपला आहे. काढणीवर आलेल्या हरभरा पिकाचेही मोठे नुकसान झाले असून आंब्याला आलेला मोहोर गळून पडला आहे. संत्रा बागांनाही या पावसाचा फटका बसला आहे. आंबिया बहाराला नुकसान पोहोचले आहे.
बुलढाणा शहरातील मध्यवस्तीतील जयस्तंभ चौक परिसरात वीज पडून चार ते पाच दुकानांना आग लागून १० लाखांहून अधिक स्टेशनरी साहित्य व अन्य मालमत्ता खाक झाली. सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही. या नैसर्गिक आपत्तीत प्रकाश देशलहरा यांच्या सचिन एजन्सीचे व लगतच्या दुकानाचे नुकसान झाले. पावसाने गहू, हरभरा, ओंवा, मका या रब्बी पिकांचे नुकसान झाले. फळबागा व भाजीपाल्याचेही नुकसान झाले.
चंद्रपूर जिल्हय़ात पहाटे सर्वदूर वादळी मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे थोडय़ा फार प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पावसाचा जोर इतका होता की शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागात मूल, चिमूर, ब्रह्मपुरी, राजुरा, सावली, गोंडपिंपरी, पोंभूर्णा व भद्रावती येथे वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नुकसानीची आकडेवारी अजून तरी आलेली नाही, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक हसनाबादे यांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्याला वादळासह पावसाने झोडपून काढले. हरभर व गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून पडला. डांबरीकरणाची कामे सुरू असलेल्या रस्त्यांना हानी पोहोचली.
अकोला येथे तुरळक पाऊस झाला. अर्धा तास वादळी हवा वाहात होती. काही काळ वीज पुरवठा ख्ांडित झाला होता. पातूर तालुक्यात पावसाचा फळ पिकांना जोरदार फ टका बसला. आंब्याला चांगला मोहोर असतांना या वादळी पावसाने या मोहोराला सुद्धा तडाखा बसला. श्रींच्या प्रकट दिनानिमित्त अनेक ठिकाणी मोठे मंडप टाकण्यात आले होते. या वादळाने त्या मंडपांचे कापड उडून गेले. गोंदिया जिल्ह्य़ात पहाटे तासभर वादळासह पाऊस झाला. यामुळे हरभरा व कापून ठेवलेल्या धान पिकाचे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यालाही या पावसाचा तडाखा बसला आहे. नैसर्गिक आपत्तीने शेतक ऱ्यांना पुन्हा झोडपले, अशा स्थितीत शासनाने शेतक ऱ्यांना तातडीने मदत द्यावी, त्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी केली आहे.