रायगड जिल्ह्याला शनिवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने आंबा, काजू व वाल हे पीक अडचणीत आले आहे. तर वीटभट्टी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारचा दिवस उजाडला तोच ढगांनी भरलेले आभाळ घेऊन आकाश अभ्राच्छादित असतानाच हवेत गारवा वाढत गेला. दुपारी किरकोळ पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या सर्वच भागांत हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसाने जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठय़ा प्रमाणात झाली. त्याचे पंचनामे केले जाणार आहेत.     
वाल व इतर कडधान्याच्या पिकांची काढणी सुरू आहे. अशातच पावसाने हजेरीही लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आंब्याला यंदा उशिरा मोहोर येणार हे निश्चित होते. आता मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सुरू झालेल्या पावसामुळे मोहोर गळून पडण्याबरोबरच फळांवर डाग पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील वाल, पांढरा कांदा, किलगड, यांसारख्या पिकांचे अवेळी पावसामुळे नुकसान होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.  कापून ठेवलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार आहे. हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.  नुकताच सुरू झालेला वीटभट्टी हंगाम अडचणीत आला आहे. पावसामुळे वीटभट्टय़ांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांत कच्च्या विटा पाडण्याचे काम सुरू झाले होते. मात्र ऐन हंगामात ओढवलेल्या या आपत्तीने वीटभट्टी व्यवसायाचे कंबरडे मोडून टाकले आहे. या आपत्तीतून सावरण्यासाठी किमान १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता वीटभट्टीचालकांनी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वीटभट्टय़ांचा व्यवसाय करतात. त्यामुळे या नुकसानीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती पेण तालुका वीटभट्टी महासंघाने केली आहे.