गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकाराने अनेक गावांत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम लोकसहभागातून सुरू आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असले तरी लाखो लिटर पाणी साचले आहे.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे २१ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. ४० फूट रुंद व ८ फूट खोलीकरण व सुमारे सव्वा किलोमीटर लांबीच्या अंतराचे काम पूर्ण झाले. गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे संपूर्ण नाला तुडुंब भरला आहे. नाल्यातून वाहणारे पाणी खडकातून वेगाने जमिनीत मुरते आहे. परिणामी नाल्याच्या शेजारच्या व परिसरातील कोरडय़ा विहिरीत पाणी आले आहे.
बालाजी स्वामी यांच्या विहिरीत २० फूट पाणी आले आहे तर वैजनाथ मुंडे, निजाम शेख, देवेंद्र आमले, सखाराम कुलकर्णी यांच्या विहिरींना १० फुटांपर्यंत पाणी आले आहे. या सर्व विहिरी दोनच दिवसांपूर्वी कोरडय़ा होत्या. किनगाव येथे ग्रामपंचायत, पंचायत समिती व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. केवळ अवकाळी पावसाने भूगर्भातील पाणीसाठा वाढून शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी आले आहे. पावसाळय़ात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना याचा चांगलाच लाभ होणार आहे. जिल्हय़ातील विविध भागात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकाराने लोकसहभाग घेऊन जनजागृती व जलसंधर्वनाची कामे सुरू आहेत. या कामात लोकांनी आणखीन सहभाग देण्याची गरज आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव व माधव गोमारे यांनी व्यक्त केली आहे.