सलग दुसऱ्या दिवशीही नाशिकसह जिल्ह्यात पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकरी पिता-पुत्राचा बळी घेतला. शनिवारी दुपारनंतर सुरू झालेली पावसाची रिपरिप रात्रभर कायम राहिली. रविवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्यात पाऊस मुसळधार स्वरूपात कोसळला. पावसामुळे डाळिंब, द्राक्ष, कांदा आणि गहू पिकांचे नुकसान झाले असून जिल्ह्यात सरासरी ६.७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे चोवीस तासांत नाशिककरांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्याचा एकत्रित अनुभव घेता आला आहे. परंतु त्यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते, असा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच वातावरणातील बदल जाणवू लागला होता. थंडगार वारे आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाळ्यातही नाशिककर थंडीने कुडकुडू लागले. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे कूपनलिकेला असलेली वीजमोटार बंद करताना सुनील आहेर (२५) यास शॉक लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्यास वाचविण्यासाठी वडील दामोदर केदार आहेर (५४) हे धावले. तेही शॉक लागून कोसळले. पावसामुळे मोटारीच्या पेटीत विजेचा प्रवाह उतरल्याने त्यांना शॉक बसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दोघांना लखमापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शहरासह जिल्ह्याच्या इतर भागांतही रात्रभर कायम राहिल्याने पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद निफाड (१९.३६) झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. या तालुक्यात निफाडसह, ओझर, पिंपळगाव, सायखेडा, लासलगाव या परिसरात अधिक पाऊस झाला. याशिवाय येवला (१३.६२), कळवण (८.५५), मालेगाव (८.५१), दिंडोरी (७.८३), सिन्नर (७.१६), नांदगाव (५.६४), इगतपुरी (५.३२), सटाणा (५.०८) याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. द्राक्षबागांची काढणी सुरू असतानाच पाऊस आल्याने रोग पडू नये म्हणून शेतकऱ्यांना महागडय़ा औषधांची फवारणी करणे भाग पडले आहे. आंब्यांचा मोहोर मोठय़ा प्रमाणावर गळाल्याने आंबा उत्पादकही धास्तावले आहेत. दुसरीकडे आधीच स्वाइन फ्लूने नागरिक हैराण झाले असताना बदलते हवामान त्यास पोषक असल्याने आजार अधिक बळावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.