वादळी वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ९२८७ शेतकऱ्यांचे ५६४२.८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान गहू आणि कांदा पिकाचे झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गाला कोटय़वधींचा फटका सहन करावा लागला आहे.
वर्षभरापासून नाशिक जिल्ह्यास नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. यामुळे हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली होती. त्या धक्क्यातून शेतकरी वर्ग सावरला नसताना पुन्हा नव्याने त्याच संकटाला सामोरे जावे लागले. मंगळवारी जिल्ह्यात १८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. काही भागात गारपीट झाली. या संकटाचा सर्वाधिक फटका कळवण तालुक्यास सहन करावा लागला.
अवकाळी पावसाने सात तालुक्यांतील ५ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात कांदा २६३७ हेक्टर, गहू २३७७, हरभरा २६८, द्राक्ष १०६, डाळिंब १९७, बटाटा १४, रोपवाटिका ५, मसूर २४ आणि १२ हेक्टरवरील वाटाणा पिकाचा समावेश आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. एकटय़ा कळवण तालुक्यात ४१९५ शेतकऱ्यांचे २१४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याखालोखाल निफाड तालुक्यातील ३५०० शेतकऱ्यांची २६०० हेक्टरवरील पिके बाधित झाली. उपरोक्त तालुक्यातील ९५ गावांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. याआधी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी वर्ग करीत आहे.