अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक व धुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांसह कांदा, टोमॅटो, कांदा, कपाशी व गहू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मंगळवारी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामे सुरू केले आहेत. नंदुरबार जिल्ह्यासही अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्या भागातील हरभरा, केळी, गहू, मिरची व पपईचे नुकसान झाले. दहा दिवसांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यास सलग दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. त्यात प्रामुख्याने इगतपुरी, मालेगाव, बागलाण, निफाड, सटाणा, नांदगाव, कळवण तालुक्यांचा समावेश आहे. सोमवारी जिल्ह्यात २९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असताना कोसळलेल्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक द्राक्षबागा भुईसपाट झाल्या.
मंगळवारी या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत होते. बहुतांश ठिकाणी द्राक्ष तोडणीचे काम बंद ठेवणे भाग पडले. अनेक तालुक्यात गहू, टोमॅटो, भाजीपाला व कांदा पिके आडवी झाली आहेत. इगतपुरी तालुक्यात टोमॅटो, फ्लॉवर व ढोबळी मिरचीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तालुक्यात सर्वच बागायती पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. आडव्या झालेल्या द्राक्ष बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी बांबूंचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते. बांबूंच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. धुळे जिल्ह्यात गारपिटीने पिकांना झोडपले तर नंदुरबारमध्ये सलग दोन दिवस संततधार सुरू आहे.
पावसामुळे गहू, हरभरा, पपई व मिरची आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. धुळे जिल्ह्यातही उपरोक्त पिकांसह कपाशीची हानी झाली. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरे कोसळली. नाशिक जिल्ह्यात प्रशासनाने कृषी विभागाच्या मदतीने पंचनामे करण्याचे काम तातडीने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील महिन्यात २१ ते २३ जानेवारी दरम्यान झालेल्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता. त्यात २९ कोटींचे नुकसान झाले. पावसाने आधीच इतके नुकसान झाले असताना पुन्हा त्याच चक्रात शेतकरी भरडला गेला आहे.