मोसमी पावसाने अपेक्षित साथ दिलीच नाही आणि बेमोसमी पाऊस पाठ सोडायचे नावही घेत नाही, अशा विचित्र कोंडीत मराठवाडय़ातील शेतकरी सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना आणि औरंगाबाद शहरांत अवकाळीच्या जोडीला काही ठिकाणी गाराही पडल्या. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी पुरता गांजला आहे. दरम्यान, जालना जिल्ह्य़ात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. रब्बी हंगामातील उरलीसुरली पिके आणि आंबाबागेचेही या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. गुरुवारी दिवसा व रात्री, तसेच शुक्रवारीही औरंगाबाद, उस्मानाबादसह विभागात ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात अवकाळीचा कहर सुरू होता.