उत्तर महाराष्ट्राला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले. गेल्या तीन दिवसात पावसाने दोघांचा बळी घेतला असून तीन जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वादळीवाऱ्यासह तुफान गारपीट झाल्याने पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. धुळे जिल्ह्य़ात गुरुवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. शहरापासून जवळच असलेल्या वडजाई शिवारात बचावासाठी झाडाखाली थांबलेल्या पंडित पवार (४०, वडजाई) यांच्या डोक्यावर फांदी पडल्याने ते ठार झाले. त्यांच्यासोबत असलेले  कैलास सोनवणे (२५) हे गंभीर जखमी झाले. दुसरी घटना साक्री तालुक्यात घडली. नांदवन शिवारातील शेतात वादळीवाऱ्याने तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने महेंद्र पगारे (७) या बालकाचा मृत्यू झाला.  पावसामुळे गहू, मका, हरभरा, ज्वारी आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.