लेखापरीक्षणामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपासह भ्रष्टाचारावर विचारणा करणा-या दोन विद्यमान संचालकांसह ६  सदस्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा अजब प्रकार शासकीय सभासदांच्या सॅलरी सोसायटीच्या वार्षिक सभेत रविवारी घडला. केवळ अर्धा तासात विषय पत्रिकेवरील १६ विषय मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदीप कदम होते.
सोसायटीत नव्याने नोकरभरती करण्यात आली आहे. या भरतीबाबत न्यायालयीन वाद सुरू असून सत्ताधारी गटाने राबविलेल्या भरती प्रक्रियेबाबत विरोधी गटाने आक्षेप घेतले आहेत. नोकर भरती पारदर्शी व निष्पक्ष व्हावी यासाठी संचालक मंडळातील दोघांनी मागणी केली असून यालाच सत्तेवर असणा-या मंडळींचा आक्षेप आहे. न्यायालयाची स्थगिती असताना नोकर भरती कशी करता येते अशी विचारणा करण्यात येत होती याशिवाय लेखापरीक्षणात नोंदविण्यात आलेल्या दोषारोपाबाबत काय कारवाई करण्यात आली याची माहिती मागण्याचा प्रयत्न सभेत करण्यात आला.
तथापि, बहुमताच्या जोरावर मंजूर, मंजूरच्या घोषणा देत या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अध्यक्ष श्री. कदम यांनी स्वागत केल्यानंतर सचिव खांबे यानी नोटीस वाचन केले. इतिवृत्त व दोष दुरुस्ती अहवालावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न संचालक सुकुमार पाटील यांनी केला. आयत्या वेळच्या विषयात उत्तरे देण्यात येतील असे सांगण्यात आले.
विषय पत्रिकेवरील १६ विषय अवघ्या अध्र्या तासात संपविण्यात आले. पोटनियम दुरुस्तीवर कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र आयत्या वेळच्या विषयात २ संचालक सुकुमार पाटील व रामराव मोडे यांच्यासह छोटुराव देशमुख, बी. बी. लाड, नंदू ढोबळे, बजरंग कदम व तात्या कुलकर्णी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव बहुमताच्या जोरावर करण्यात आला. सभा वादळी होणार हे लक्षात घेउन मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता.