News Flash

यंदाही ‘अवकाळी’चा तडाखा

वीटभट्टी व्यवसायिक अडचणीत

शेतकरी, मच्छीमार, फळबागायतदार, मीठ उत्पादक, वीटभट्टी व्यवसायिक अडचणीत

वसई : शुक्रवारपासून वसईच्या विविध ठिकाणच्या भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मागील वर्षांप्रमाणे यंदाही पारंपरिक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

या अवकाळी पावसाने समुद्रकिनाऱ्यावर सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी ओली झाली आहे. दरवर्षी हिवाळ्याच्या हंगामात मोठय़ा प्रमाणात मासळी सुकविण्याचे काम पाचूबंदर, अर्नाळा यासह इतर समुद्रकिनाऱ्यांवर होत असते. परंतु यावर्षी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व मासळी भिजून खराब झाल्याने फेकून द्यावी लागली असून यावर्षी सुक्या मासळीची होणारी आवकही  घटण्याची शक्यता वर्तवली आहे.

तर दुसरीकडे भात झोडणीसाठी खळ्यात एकावर एक रचून ठेवलेले भाताचे भारे भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भातकापणी झाल्यानंतर वसई पूर्व ग्रामीण भागात उन्हाळी शेतीच्या लागवडीला सुरुवात केली आहे. सध्या गवार, टोमॅटो, मिरची, सफेद कांदे, हरभरा, भुईमूग, तूरडाळ अशा पिकांची लागवड करण्याचे काम सुरू आहे.

काही ठिकाणी या पिकांची रोपे तग धरू लागली आहेत. मात्र सध्या अवकाळीचे संकट असल्याने शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. काही ठिकाणच्या भागात फळझाडांवर मोहर बहरू लागला आहे, परंतु या वातावरणातील बदलामुळे आलेला मोहर खळून जाण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मीठ उत्पादन व्यवसाय लांबणीवर

वसईच्या विविध भागात अवेळी झालेल्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या मीठ  उत्पादनावरही परिणाम झाला आहे. यामुळे मीठ उत्पादन करण्याचे काम हे लांबणीवर पडणार आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान वसईच्या भागात चोपणे, पाणी जमा करणे, त्याची योग्य ती डिग्री तयार करणे अशा मीठ पिकविण्यासाठीच्या विविध प्रक्रियांच्या कामाला  सुरुवात होत असते. परंतु सलग दुसऱ्यावर्षी अवकाळी पावसाचे सावट आल्याने हा व्यवसाय सुरू होण्यास विलंब होणार असल्याचे मीठ उत्पादकांनी सांगितले आहे.

मजुरांची कमतरता, उत्पादन खर्च,  दूषित खाडय़ा, बाजारमंदी,  पूरस्थिती यामुळे आधीच अडचणी होत्या. त्यात आता अवकाळी पावसाच्या समस्येची भर पडली आहे.

वीटभट्टी व्यवसाय उशिराने

अवकाळीचा वीटभट्टी व्यवसायाला फटका  बसला आहे. पालघर जिल्ह्यतील पारोळ, शिरवली, उसगाव, मेढे, आंबोडे, घाटेघर, सायवन, भिनार, देपिवली, माजिवली, म्हस्कीने, तिल्हेर, भाताणे, नवसई, शिवणसई, कामण यासह वसईच्या विविध ठिकाणच्या ग्रामीण भागात वीटभट्टी हा व्यवसाय केला जात आहे. करोनाकाळात लवकर हा व्यवसाय बंद करावा लागला होता. आता व्यवसाय सुरू होईल या आशेने मजूरही स्थलांतरित झाले आहेत. अवकाळी पाऊस सुरू झाल्याने हाही व्यवसाय  उशिराने सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:04 am

Web Title: untimely rains in various parts of vasai zws 70
Next Stories
1 कौटुंबिक वादातून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न
2 पोलिसांच्या गणवेशाच्या रंगसमानतेसाठी एकाच ठेकेदाराकडून खरेदी
3 जेजुरीची सोमवती यात्रा साधेपणाने साजरी
Just Now!
X