मुंबई, पुणे, नागपूर ही महानगरे वगळता राज्याच्या ग्रामीण भागात असलेल्या अद्ययावत नाटय़गृहांची एकत्रित सूची करण्याचे काम सध्या सुरू आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील नाटय़गृहांचे सर्वेक्षण केले जात आहे. राज्य व राज्याबाहेरील व्यावसायिक संस्थांना उत्कृष्ट नाटय़गृह राज्यातील ग्रामीण भागातही उपलब्ध आहे याची माहिती मिळावी, या साठी हे सर्वेक्षण केले जात आहे. त्यातून ग्रामीण भागात अद्ययावत नाटय़गृहांचे जतन-संवर्धन या हेतूने राज्य सरकारने सर्वेक्षणासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली. पकी एका पथकाने येथील नाटय़गृहाची नुकतीच पाहणी केली.
ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात कलाकार आहेत. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन व सोयी-सुविधांअभावी त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन सरकारने राज्यातील प्रत्येक शहरात अद्ययावत नाटय़गृह निर्माण करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी नाटय़गृह आहे; मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी त्यांची अवस्था बिकट आहे, त्यांना निधी देऊ करून त्याचे जतन व संवर्धन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यासाठी तज्ज्ञ वास्तुविशारदांच्या माध्यमातून या नाटय़गृहांच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. नाटय़गृहात प्रकाश व्यवस्था कशी आहे, स्वच्छतागृहांची अवस्था काय आहे, आसनव्यवस्था, मेकअप रूम, व्हीआयपी रूम, फिडिंग रूम, अग्निशमन व्यवस्था, वातानुकूलित आसनव्यवस्था अशा विविध निकषांची तपासणी यात केली जात आहे.
उस्मानाबादेत नगरपालिकेच्या वतीने अद्ययावत नाटय़गृह उभारण्यात आले. मात्र, अनेक वर्षांपासून ते वापराविना बंद आहे. या नाटय़गृहाचीही सरकारने नियुक्त केलेल्या लातूर येथील तज्ज्ञ प्रा. अमृता देशमुख यांच्या पथकाने पाहणी केली. नगराध्यक्ष मकरंद राजेिनबाळकर यांनी नाटय़गृहाची पूर्ण माहिती त्यांच्यासमोर मांडली. निधीअभावी रखडलेली कामे देशमुख यांच्या नजरेसमोर आणून दिली. नाटय़गृहाची सर्व निकषांवर पाहणी झाल्यानंतर सरकारकडे अहवाल पाठवणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. राज्यातील मोजक्या नाटय़गृहांची चांगली उभारणी झाली. काही तांत्रिक बाबी वगळता उस्मानाबादचे नाटय़गृह उत्कृष्ट आहे. मात्र, लवकरच याचा वापर सुरू व्हायला हवा अन्यथा देखभाल-दुरुस्तीसाठी आगाऊ पसे खर्च करावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ अभिनेते काकासाहेब िशदे, प्रा. माधवी सलगर, कवी डी. के. शेख यांची या वेळी उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय कलाकारांना जोडण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठय़ा कलाकारांना ग्रामीण भागात उपलब्ध अद्ययावत नाटय़गृहांची माहिती नसते. त्यामुळे महानगरांमध्येच कार्यक्रम आयोजित केले जातात. पुढील काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातील उत्कृष्ट नाटय़गृहांची सूची अशा व्यावसायिक संस्थांपर्यंत पोहोचावी, या साठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे व या खात्याचे संचालक अजय आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. पुणे, मुंबईप्रमाणे अद्ययावत सुविधा असलेली नाटय़गृहे ग्रामीण भागात निर्माण करणे, उपलब्ध नाटय़गृहांचे जतन-संवर्धन करणे आणि स्थानिक कलाकारांना संधी देऊन जागतिक कीर्तीच्या कलाकारांना ग्रामीण भागासोबत जोडणे हा या सर्वेक्षणामागील हेतू असल्याची माहिती राज्य नाटय़ स्पध्रेचे मुख्य समन्वयक नविद इनामदार यांनी दिली.
* नाटय़गृह संस्कृती ही शहरातील सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख साधन असल्यामुळे त्याचे जतन, संवर्धन व विकास करणे.
* महाराष्ट्रातील नाटय़गृहांची यादी तयार करणे. नाटय़गृहांच्या सर्व माहितीसह ही यादी संकेतस्थळावर पाहावयास मिळेल.
* सर्व नाटय़गृहे आधुनिक सुविधांनी युक्त असायला हवीत. त्यासाठी जे उत्तम नाटय़गृह आहे, त्याची माहिती आदर्श म्हणून इतर नाटय़गृहांपर्यंत पोहोचणार.
* नाटय़गृहातील बदल, सर्व सोयींचा विचार, स्थानिक कलावंत, रंगकर्मी, नागरिकांच्या सल्ल्याने व सूचनेने करण्याचा प्रयत्न.
* महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील व्यावसायिक नाटय़ व इतर कार्य करणाऱ्या व्यावसायिक संस्थांना राज्याच्या कानाकोपऱ्यातील नाटय़गृहांची एकत्रित माहिती मिळणार.