मराठवाडय़ातील आठ जागांसाठी उमेदवारीबाबत चित्र अस्पष्ट

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

लोकसभेच्या मराठवाडय़ातील आठ जागांसाठी आघाडीत उमेदवारांचा दुष्काळ असल्याचे चित्र आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राजीव सातव यांनी एका अर्थाने माघार घेतली आहे. उस्मानाबादमध्ये डॉ. पद्मसिंह पाटील आता लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, असे त्यांचे समर्थक सांगू लागले आहेत. बीड लोकसभेसाठी २०१४ मध्ये दिलेले उमेदवार सुरेश धस आता भाजपवासी झाले आहे. त्यामुळे तेथे नवीन उमेदवाराचा शोध सुरू आहे. औरंगाबादचे लोकसभेचे उमेदवार कोण, याविषयी काँग्रेसमध्ये अधूनमधून चर्चा असते. पण जागांच्या अदलाबदलीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास आमदार सतीश चव्हाण इच्छुक असले तरी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीची स्थिती कुपोषणाच्या चौथ्या श्रेणीतील असल्याने मराठवाडय़ातील बहुतांश जागांवर उमेदवारीचा दुष्काळ म्हणता येईल, असे चित्र दिसून येत आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही, हे अद्याप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे ठरलेले नाही. त्यांचे समर्थक अशोकरावांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करत आहेत. त्यामुळे ते लोकसभेच्या मैदानात उतरतील की नाही, याविषयी शंका घेतली जात आहे. लातूर मतदारसंघात काँग्रेसला अजूनही उमेदवार शोधता आला नाही. हा मतदारसंघ राखीव असल्याने समर्थक व्यक्तीला लातूर येथून उभे करायचे, असे गणित काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख मांडायचे. त्यातूनच जयवंतराव आवळे लातूरचे खासदार झाले होते. कोल्हापूरचा माणूस लातूरमधून खासदार करण्यात पक्षाला यश आले होते. यानंतर भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी यश मिळविले. त्यानंतर लातूरमधून काँग्रेसला उमेदवार नसल्याचे चित्र आहे. भाजपमधील नाराज व्यक्तीला आपल्याकडे ओढून घेता येईल आणि त्यांना उमेदवारी देऊन गरज भागवली जाईल, असे काँग्रेसमधून सांगितले जाते. मात्र सार्वत्रिक समर्थन असणारा उमेदवार अजूनही लातूर मतदारसंघात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये औरंगाबादहून आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे यांची नावे चर्चेत असली तरी नक्की उमेदवार कोण असेल, हे अजूनही निश्चित झालेले नाही.

बीड जिल्ह्य़ात राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अमरसिंह पंडितांचे नाव काही नेते पुढे करत आहेत. मात्र गेल्या वेळचे उमेदवार भाजपवासी झाले असल्याने तेथेही राष्ट्रवादीला नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे. उस्मानाबादचे माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील या वेळी लोकसभा निवडणुकीत उतरतील की नाही, याविषयी त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये शंका आहे. अद्याप त्यांना पक्षाकडून उमेदवारीबाबत विचारणा झालेली नाही, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच सांगितले होते. मात्र या मतदारसंघातही उमेदवाराचा नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. एकंदरच मराठवाडय़ातील आठही जागांसाठी आघाडीतील उमेदवारांबाबत दुष्काळाची स्थिती दिसून येत आहे. भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार मात्र जवळपास नक्की असल्याचे मानले जात आहे. औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेना सतत जिंकत असल्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील, असा दावा शिवसैनिकांकडून केला जातो. ते स्वत:ही मतदारसंघात फिरत आहेत. शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविषयी सेनेतही नाराजी आहे. ते मतदारसंघात संपर्क ठेवत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो.

तर परभणीतही विजय मिळविणारे शिवसेनेचे खासदार संजय जाधव वेगवेगळ्या आंदोलनाला दिशा देत पुन्हा सक्रिय झाले आहे. अलीकडेच त्यांनी परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी आंदोलन हाती घेतले. तत्पूर्वी पीक विम्याच्या आंदोलनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका वठविली. या पाश्र्वभूमीवर सेना आणि भाजपकडे त्यांचे उमेदवार कायम असल्याचे दिसते.

जालन्यात दानवेंविरोधात कोण?

जालन्यातही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना सर्वपक्षीय नेते गळ घालत आहे. या मतदारसंघातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे सांगण्यात येते. सिल्लोडचे आमदार तथा औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी तर अर्जुन खोतकर यांच्यामागे काँग्रेस ताकद उभी करेल, असे जाहीरपणे सांगितले आहे. बच्चू कडूही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. मात्र या लोकसभा मतदारसंघातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार कोण, हे ठरवता आलेले नाही.

ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी, अशी मागणी केली जाणार होती. ती यशस्वी झाली तरी उमेदवार कोण, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

रवींद्र गायकवाड यांच्याबाबत नाराजी

शिवसेनेकडून निवडून आलेल्या खासदारांमध्ये उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविषयी सेनेतही नाराजी आहे. ते मतदारसंघात संपर्क ठेवत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. परभणीतही विजय मिळविणारे शिवसेनेचे खासदार संजय जाधव वेगवेगळ्या आंदोलनाला दिशा देत पुन्हा सक्रिय झाले आहे.