रेल्वेमार्गाद्वारे शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. शिर्डीत येऊन हे भाविक साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतात. अशा भाविकांना अद्यायावत पायाभूत सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील राहील अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शिर्डीत दिली.

शिर्डीत साईबाबांच्या दर्शन आरतीसाठी आले असता शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, मुख्यकार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, प्रथमनगराध्यक्ष कैलास बापू कोते, नगराध्यक्षा योगिता शेळके, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, रवींद्र गोंदकर, प्रमोद गोंदकर,  नगरसेवक अभय शेळके आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे गोयल म्हणाले की, शिर्डीत साईबाबांच्या दर्शन करण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. मात्र ती संधी साईबाबा समाधी वर्ष व हनुमान जयंतीच्या निमीत्ताने साई बाबांची आरती करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूप समाधान प्राप्त झाले आहे.

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्टेशन डबल ट्रॅक करण्याऐवजी पुणतांबा येथे रेल्वे जंक्शन करण्यात यावे यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी निवदेन दिले. प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणतांबा ते शिर्डी साईनगर या रेल्वे मार्गालगत नव्याने आणखी एक रेल्वे मार्ग बनविण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्टेशन दुहेरी मार्ग करण्याऐवजी पुणतांबा येथे रेल्वेचे जंक्शन उभारण्यात यावे. साईभक्तांच्या सुलभतेच्या दृष्टीने देशातील सर्वच प्रमुख रेल्वेमार्ग पुणतांबा येथे जोडण्यात यावी व पुणतांबा ते शिर्डी साईनगर या रेल्वे मार्गावर शटल सेवा सुरु करावी. शिर्डी ते पुणतांबा हे अंतर १४ किलोमीटर इतके आहे व पोहोचण्यासाठी सध्या १५ मिनिटे लागतात. सध्या पुणतांबा ते शिर्डी हा रस्ता २० फुट रुंदीचा आहे, हाच रस्ता वाढवून ६० फुट रुंदीचा केल्यास पुणतांबा ते शिर्डी अंतर काही मिनिटात पार करता येईल. पुणतांबा येथे रेल्वेचे जंक्शन केल्यास पुणतांबा गावाचा विकास होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. श्री क्षेत्र पुणतांबा येथे योगिराज चांगदेव महाराजांची समाधी आहे. या देवस्थानचा विकास व पुणतांबा येथे रेल्वेचे जंक्शन झाल्यास पुणतांबा गावाची परिस्थिती बदलून जाईल, अशी मागणी करण्यात आली आहे.