नगर परिषदेची अद्ययावत जलव्यवस्थापन यंत्रणा लवकरच कार्यान्वित

पालघर : पालघर नगर परिषदेसह अठरा गावांसाठी कार्यान्वित असलेल्या पाणीपुरवठय़ावर लक्ष ठेवण्यासाठी पालघर नगर परिषदेतर्फे अद्ययावत जलव्यवस्थापन यंत्रणा राबविण्यात येणार आहे. या यंत्रणेमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही यावर लक्ष ठेवणे हे मध्यवर्ती कक्षेतून शक्य होणार आहे. येत्या चार महिन्यांत ही कार्यप्रणाली कार्यान्वित होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालघर व २६ गावच्या प्रादेशिक नळपाणी योजनेच्या माध्यमातून सूर्या नदीतून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना जून २००९ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण अवस्थेत असलेली ही योजना ऑक्टोबर २०११ मध्ये पालघर नगर परिषदेकडे हस्तांतरित केली.  पालघर नगर परिषद यामध्ये देखभाल दुरुस्ती तसेच पाण्याचे शुद्धीकरणाचे काम पाहात आहेत. यामध्ये वीज आकारणीची देयके काही पंचायत समित्या नगर परिषदेस देत आहेत. सद्य:स्थितीत पंचायत समितीकडून कोटय़वधी रुपयांची देयके बाकी असून त्यामुळे या योजनेचा अधिक भार पालघरच्या नागरिकांना सोसावा लागत आहे. या योजनेतील पालघर, गोठणपूर, वेवूर, घोलवीरा, नवली, लोकमान्य नगर, टेंभोडे, अल्याळी ही आठ गावे पालघर नगर परिषदेमध्ये समाविष्ट झाली आहेत. उर्वरित १८ गावांना नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक ग्रामपंचायती आपल्याला नियमित पाणी मिळत नसल्याचे तसेच कमी दाबाने पाणी येत असल्याचे तक्रारी करत असतात. त्याचप्रमाणे काही ग्रामपंचायतींनी नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल केली नसल्याने मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे.

या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांनी बैठक आयोजित केली होती. या वेळी नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता रवींद्र दुधी, अरुण निरभवणे, साहाय्यक गटविकास अधिकारी विनोद पाटील, पालघर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे एच. बी. सिर्सिकर, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. आर. पाध्ये आदी अधिकारी उपस्थित होते.

मध्यवर्ती कक्षातून नियंत्रण

पाणीयोजनेवर दर महिन्याला सुमारे ४१ लाख रुपये इतका खर्च येतो. ज्या गावांना पाणीपुरवठा केला जातो त्या प्रत्येक गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो मीटर बसवण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. विविध ठिकाणी वॉलवर मोटराईस व स्वयंचलित यंत्रणा बसवून या पाइपलाइनमधून केला जाणारा पाणीपुरवठय़ावर देखरेख व नियंत्रण मध्यवर्ती कक्षातून करण्याचे योजिले आहे. अशाप्रकारे १९ अद्यावत प्रणालीचे मीटर बसवण्यासाठी तांत्रिक मान्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया व इतर सोपस्कार पूर्ण करून येत्या तीन-चार महिन्यांत ही  प्रणाली कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या कामासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च येण्याचे अपेक्षित असून मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे  विविध गावांना होणारा पाणीपुरवठा पाहता येणे शक्य होणार आहे.