दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात प्रस्ताव मांडून सत्ता बाकावरून चर्चेची तयारी असतानाही आधी पॅकेज व नंतर चर्चा अशी मागणी करीत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक होत एकजुटीने गोंधळ घातल्यामुळे विधानसभेचे कामकाज मंगळवारी चारवेळा तहकूब करावे लागले. सभागृहाबाहेर वेगवेगळया भूमिकेत वावरणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात मात्र गोंधळ घालण्यासाठी एकत्र आल्याचे दृश्य सलग दोन दिवस विधान परिषदेत बघायला मिळाले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचे कामकाज सुरू होत असतानाच विरोधकांनी ‘पॅकेज द्या’ घोषणा देत विधानसभेत प्रवेश केला. अध्यक्षांनी प्रश्नोत्तरे पुकारली. त्याचवेळी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करा’ अशी मागणी केली. हसन मुश्रीफ, विजय वडेट्टीवार, शशीकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आदींसह विरोधी बाकावरील सदस्य अध्यक्षांच्या आसनापुढील हौदात एकत्र येत घोषणा देणे सुरू केले. ‘या विषयावर नियम २९३ अन्वये आजच चर्चा होणार असून आता शांत राहा’, असे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले. ‘कालचा मोर्चा फसल्यामुळे आता विरोधकांजवळ काहीच राहिलेले नाही म्हणून हा गोंधळ घातला जात आहे. यासबंधीचा प्रस्ताव येणार असून तेव्हा चर्चा व्हावी, हवे तर दोन-तीन दिवस चर्चा करू, आधी प्रश्नोत्तरे होऊ द्या’, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले. वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चर्चेची तयारी दर्शविली. अध्यक्षांनी या गदारोळात प्रश्नोत्तरे पुकारली व मंत्र्यांनी उत्तरेही दिली.
लातूर जिल्ह्य़ातील पाणी टंचाईसंबंधी प्रश्न सुरू असतानाच ‘राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये पाणी टंचाई असून सर्व दुष्काळग्रस्त भागाला किती पॅकेज देणार आहात, काय उपाययोजना करणार हे सांगा व आधी पॅकेज घोषित करा’, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केले. या गोंधळाकडे दुर्लक्ष करीत प्रश्नोत्तरे सुरूच होती. स्थगन प्रस्ताव दिल्याने त्यावर आधी चर्चेची मागणी जयंत पाटील यांनी केली. दिलीप वळसे पाटील यांनीही तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. साडेबारा वाजता कामकाज सुरू झाले तेव्हा सर्व स्थगन प्रस्ताव नाकारत असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. विरोधकांनी गदारोळ सुरू केला.
 त्या गदारोळात शासकीय विधेयके संमत करण्यात आली.  महसूलमंत्र्यांनी चर्चा सुरू करण्याची मागणी अध्यक्षांना केली.  पण त्याआधी पॅकेज जाहीर करा’, अशी मागणी भुजबळ यांनी लावून धरली. ‘तुम्ही आधी खाली बसा तुम्हाला संधी देतो’ असे अध्यक्ष विरोधी सदस्यांना म्हणाले. गदारोळ सुरूच राहिल्याने अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

विधान परिषदेतही गदारोळ
विरोधकांनी विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवातच होऊ दिली नाही. सभापती शिवाजीराव देशमुख सभागृहात येताच विरोधकांनी शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांसाठी आधी पॅकेज जाहीर करा, अशी मागणी रेटून धरली. त्यामुळे कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच अवघ्या पाच मिनिटातच सभागृह २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, राज्य सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच पाहीजे यावरून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ घालण्यात काँग्रेसचे आमदार आघाडीवर असले तरी, राष्ट्रवादीनेही त्यांना साथ दिली. संजय दत्त, गोपीकिशन बजेरिया, भाई जगताप, राजेंद्र मुळक, माणिकराव ठाकरे या गोंधळात आघाडीवर होती. शेवटीशेवटी विरोधकांनी कहर करीत सभापती सभागृहात येण्यापूर्वीच घोषणाबाजी सुरू केली.गोंधळातच लेखी प्रश्नोत्तराचा तास पार पडला.  सभागृह दीड वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सभागृहात आजही गोंधळ?
विधान परिषदेत बहुमत नसल्याने  विरोध डावलून कामकाज पूर्ण करणे सत्ताधाऱ्यांना कठीण झाले आहे.दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधी पक्षांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा व्हावी, असा त्यांचा आग्रह आहे. सभागृह सुरळीत चालविण्यासाठी विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी सत्तारूढ पक्षाकडून मान्य होण्याची शक्यता आहे.