हिवाळी अधिवेशन सुरू होऊन दहा दिवस झाले तरी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता जाहीर न केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभापतीच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली. या गदारोळातच सभापतींनी पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
तारांकित प्रश्नोत्तरे संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय जाहीर करण्याची मागणी सभापतीकडे केली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेता जाहीर न झाल्याने प्रथेप्रमाणे कामकाज करण्यास अडथळे निर्माण होत आहे. ही नियुक्ती लवकरच करणार होते, या त्यांच्या वक्तव्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हा निर्णय आजच घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी लावून धरली. यावेळी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनीही तटकरे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. परंतु आपल्या भावना व्यक्त करताना दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही सभागृहातील सदस्यांची बैठक बोलवावी, अशी मागणी केली.
माणिकरावांच्या या वक्तव्याने सुनील तटकरे यांनी हा प्रश्न विधान परिषदेतील आहे. येथे कनिष्ठ सभागृहाचा काहीही संबंध येत नसल्याचे सांगितले. यावेळी काँग्रसेचे संजय दत्त यांनी आमच्या नेत्याचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे सांगितल्याने गदारोळात आणखी भर पडली. आमचे नेते बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते अडथळे आणतात. तुमचे नेते बोलत असताना आम्ही मात्र सन्मान राखतो.