कामे होत नसल्यामुळे तसेच पुरेसा आमदार विकास निधीही मिळत नसल्याने अस्वस्थ असलेल्या स्वपक्षीय आमदारांमधील नाराजी दूर करण्यासाठी त्यांना १० कोटींचे पॅकेज देण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्वादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हे संकेत देण्यात आले.
 सिंचन घोटाळा आणि अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ यावरून विरोधी पक्षांनी राष्ट्वादीलाच टार्गेट केले आहे. विरोधकांच्या आक्रमक रणनितीला सडेतोड उत्तर देण्यासाठी राष्ट्वादी आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांची स्वतंत्र बैठक आज विधान भवन परिसरात पार पडली. राष्ट्रवादीच्या बैठकीत अनेक आमदारांनी आपली काम होत नसल्याची तक्रार केली. आमदार विकास निधी कमी मिळत असून त्यातून मतदारसंघात पुरेशी कामे करता येत नाहीत. काही आमदारांनी तर सत्ता असातनाही कामे होत नसल्यामुळे लोकांच्यात नाराजी असून त्यांच्या नाराजीला आमदारांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.
 उजनी धरणात केवळ सहा टक्के पाणी असल्यामुळे पुण्यातील धरणांमधून उजनीसाठी पाणी सोडण्याची मागणी सोलापूर भागातील आमदारांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मुधकर पिचड यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. आरोप करणे हे विरोधकांचे काम असून त्यांना आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे. आमदारांनी सत्य लोकांना सांगितले पाहिजे असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितल्याचे समजते. यावेळी आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या मतदार संघातील रस्ते  व पाणी पुरवठय़ाची कामे करण्यासाठी प्रस्ताव द्यावेत, त्यासाठी प्रत्येक आमदाराला १० कोटी रूपये देण्यात येतील. हा निधी मार्तपूर्वी उपलब्ध करून दिला जाईल असे संकेतही पवार यांनी या बैठकीत दिल्याचे समजते. पक्षावर आणि नेत्यांवर होणाऱ्या आरोपांना आम्ही उत्तर देत आहोत मात्र तम्हीही नेत्यांच्या मागे उभे राहून विरोधकांच्या आरोपांना उत्तर दयावे अशी सूचना प्रदेशाध्यक्ष पिचड यांनी यावेळी केल्याचे समजते. काँग्रेस आमदारांच्या बैठकीतही विकास कामे होत नसल्याची तक्रार अनेक आमदारांनी केली. तसेच वाढीव निधीची मागणी करण्यात आल्याचे समजते.